वसईतील अपहृत चिमुरड्याची सुटका, शेजाऱ्यानेच पळवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 12:37 AM2020-03-04T00:37:49+5:302020-03-04T00:47:38+5:30
वसई पूर्वेकडील खैरपाडा परिसरात राहणाºया एका दोन वर्षांच्या चिमुरड्याचे सोमवारी अपहरण झाले होते.
नालासोपारा : वसई पूर्वेकडील खैरपाडा परिसरात राहणाºया एका दोन वर्षांच्या चिमुरड्याचे सोमवारी अपहरण झाले होते. वालीव पोलिसांनी आरोपी विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पण त्याच दिवशी संध्याकाळी या मुलाला घेऊन जाताना आरोपीला बोरिवली रेल्वे स्थानकातील कर्तव्यदक्ष लोहमार्ग पोलिसांनी हटकले. आणि या चिमुरड्याची सुखरूप सुटका केली आहे. जीआरपीने या आरोपीला पुढील चौकशीसाठी वालीव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
वसईच्या खैरपाडा परिसरातील काली मंदिराच्या शेजारील चौधरी खदानी येथे राहणाºया अंशकुमार अखिलेश यादव (२) याला त्यांच्या बाजूलाच राहणारा सनी उर्फ पुरुषोत्तम वर्मा (२५) हा खेळायला नेतो, असे सांगून सोमवारी दुपारी घेऊन गेला. पण तो परतलाच नाही. त्याच्या घरच्यांनी सगळीकडे चौकशी, शोधाशोध केली पण अंश सापडला नाही. शेवटी अंशची आई पूनमदेवी यादव (२५) हिने वालीव पोलीस ठाण्यात जाऊन अपहरणाची तक्र ार देऊन गुन्हा दाखल केला. पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला.
संध्याकाळी आरोपी अंशला घेऊन बोरिवली स्थानकातून जात असताना जीआरपी पोलिसांना संशय आल्याने त्याची चौकशी केली असता सनी याला उत्तर देता आले नाही. यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन या चिमुरड्याची सुखरूप सुटका केली.
दोन वर्षांच्या अंशचा अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता. मद्यधुंद अवस्थेतील आरोपीला बोरिवली स्थानकात जीआरपी पोलिसांनी मुलासह पकडले असून त्याची सुखरूप सुटका केली आहे. या गुन्ह्याचा आणखी तपास सुरू आहे.
-विलास चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे