अपहरण केलेल्या मुलाची आठ तासात सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 12:37 AM2018-12-08T00:37:39+5:302018-12-08T00:37:46+5:30
नालासोपारा पूर्व येथून बुधवारी मध्यरात्री दहा वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला अवघ्या आठ तासात तुळींज पोलिसांनी अटक केली आहे.
वसई : नालासोपारा पूर्व येथून बुधवारी मध्यरात्री दहा वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीला अवघ्या आठ तासात तुळींज पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या तावडीतून मुलाची सुखरुप सुटका करून त्याला पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
नालासोपारा पूर्व विजयनगर येथील जय अंबे कॉलनीत नंदलाल यादव आपली पत्नी निला व तीन मुलांसोबत राहतो. नंदलाल याचा चाळ बांधण्याचा व्यवसाय आहे. काही महिन्यांपूर्वी नायगांव येथे बांधलेल्या चाळीतील रूम त्याने गोरगांव येथील बबलू ठाकुर या व्यक्तीला विकली होती. मात्र, वारंवार सांगूनही नंदलाल रूमचा ताबा बबलूला देत नव्हता. तसेच, रूम नाही तर पैसे परत कर असा तगादा लावूनही नंदलाल घेतलेले पैसे देत नव्हता. त्यामुळे चिडलेल्या बबलू ठाकूर बुधवारी मध्यरात्री २ वाजता आपली आई व इतर दोन साथीदारां समवेत त्याच्या घरी गेला. मात्र त्यावेळी तो घरी नव्हता. तेव्हा त्याने त्याचा मुलगा हिमांशू (१०) याला ताब्यात घेत नंदलालची पत्नी निला यादव हीला धमकी देत सांगितले की, मूलगा हवा असेल तर पैसे परत करा. तसेच पोलिसांना याबाबत कळवले तर मुलगा जिवंत राहणार नाही. त्यानंतर ते त्यास घेऊन निघून गेले.
याबाबत निला यादव यांनी तुळींज पोलिस ठाण्यात धाव घेत तक्र ार दाखल केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॅनियल बेन यांनी त्वरित एक विशेष पथक अपहरणकर्त्यांच्या मागावर पाठविले. त्यांच्या मोबाईल लोकेशनवरून गोरेगांव येथून बबलू यादव व त्याच्या साथीदारांना अटक करून मुलाची सुखरुप सुटका करण्यात आली. ही कारवाई अवघ्या आठ तासात केल्याने पोलिसांचे कौतूक होत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता तोटेवाड यांनी मूलाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले असून बबलू यादव सह इतर आरोपींवर गुन्हे केल्याचे सांगितले.