जुन्या वादातून वीस लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्यास खोपोली मधून अटक
By धीरज परब | Published: May 2, 2024 12:55 AM2024-05-02T00:55:21+5:302024-05-02T00:56:01+5:30
भाईंदर पूर्वेला इंद्रलोक येथे ओमशांती चौक येथे केअरिंग व फॉरवडिंग लॉजीस्टिकचे कार्यालय आहे. त्या कार्यालयात काम करणाऱ्या अक्षय शिंदे ( वय ३२ वर्ष ) याचे दिवसा ढवळ्या अपहरण करून वीस लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती.
मीरारोड - पूर्वीच्या पैशाच्या वादातून एका ३२ वर्षीय व्यक्तीचे अपहरण करून वीस लाख रुपये खंडणी मागणाऱ्या आरोपीला भाईंदरच्या नवघर पोलिसांनी खोपोली मधून अटक केली आहे. भाईंदर पूर्वेला इंद्रलोक येथे ओमशांती चौक येथे केअरिंग व फॉरवडिंग लॉजीस्टिकचे कार्यालय आहे. त्या कार्यालयात काम करणाऱ्या अक्षय शिंदे ( वय ३२ वर्ष ) याचे दिवसा ढवळ्या अपहरण करून वीस लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती.
पैसे न दिल्यास अक्षय शिंदेचे बरी वाईट करू अशी धमकी अपहरणकर्त्याने दिली होती. कर्मचारी सागर आंग्रे यांच्या तक्रारीवरून नवघर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप व्हसकोटी व पथकाने तांत्रिक व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेऊन तो खोपोली जिल्हा रायगड येथे गेले असल्याची माहिती मिळाली.
खोपोली पोलीस व नवघर पोलिसांनी संयुक्तपणे सापळा रचून इमरान शहाबुद्दीन शेख (वय २९ वर्ष रा. नवरे आरकेड, नवरे नगर, अंबरनाथ पूर्व याला अटक केली आहे. आरोपीला अटक करून ठाणे न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.