तीनवर्षीय बालिकेचे अपहरण, बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 11:57 PM2021-01-03T23:57:49+5:302021-01-03T23:57:57+5:30

माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य 

Kidnapping, rape of a three-year-old girl | तीनवर्षीय बालिकेचे अपहरण, बलात्कार

तीनवर्षीय बालिकेचे अपहरण, बलात्कार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
तलासरी : तलासरीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. येथील आईच्या कुशीत झोपलेल्या तीनवर्षीय आदिवासी बालिकेचे शुक्रवारी रात्री बारा-साडेबारा वाजेच्या दरम्यान अपहरण करण्यात येऊन घराजवळच्या शेतात नेऊन तिच्यावर पाशवी बलात्कार करण्यात आल्याचे उघड झाले आहे. याबाबत तलासरी पोलीस स्टेशनला अपहरण व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात येऊन तीन इसमांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. तर, गंभीर जखमी बालिकेवर डहाणू येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


पीडित तीनवर्षीय बालिका आपल्या आईबरोबर घराच्या ओट्यावर शुक्रवारी रात्री झोपली होती. रात्री बारा-साडेबाराच्या सुमारास बालिका व तिची आई गाढ झोपेत असताना अज्ञात नराधम पीडित मुलीला उचलून घेऊन गेला. आपली मुलगी कोणीतरी उचलून नेली, हे लक्षात येताच तिने घरच्यांना जागे केले व मुलीचा शोध घेतला. घराजवळ मुलगी न आढळल्याने बाजूच्या शेतात पाहणी केली असता घरापासून तीन शेत दूर मुलगी रडताना व वेदनेने विव्हळताना आढळली. वेदनेने विव्हळणारी व रक्तस्राव होत असलेली आपली मुलगी दिसताच तिच्याबरोबर अनुचित घटना घडल्याचे समजून तिला तत्काळ तलासरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, ग्रामीण रुग्णालयात स्त्री वैद्यकीय अधिकारी नसल्याने व मुलीची गंभीर परिस्थिती पाहता तिला डहाणू येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.


तीन संशयित ताब्यात
तलासरी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास करून तीन संशयित इसमांना ताब्यात घेतले आहे. तलासरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजय वसावे स्वतः या घटनेचा तपास करीत असून गुन्ह्याचा छडा लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. झालेल्या घटनेचा जनवादी महिला संघटनेने निषेध व्यक्त केला असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

Web Title: Kidnapping, rape of a three-year-old girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.