जमीन हडपण्यासाठी तरुणाचे अपहरण, केडीएमसीचे भाजपा गटनेते अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 06:35 AM2018-09-27T06:35:23+5:302018-09-27T06:35:33+5:30
जमीन हडपण्यासाठी इताडे गावातील संतोष पाटील या तरुणाचे अपहरण केल्याचा आरोप केडीएमसीतील भाजपाचे गटनेते वरुण पाटील यांच्याविरोधात करण्यात आला आहे.
कल्याण : जमीन हडपण्यासाठी इताडे गावातील संतोष पाटील या तरुणाचे अपहरण केल्याचा आरोप केडीएमसीतील भाजपाचे गटनेते वरुण पाटील यांच्याविरोधात करण्यात आला आहे. या घटनेला दोन वर्षे झाली असून अद्यापही त्याच शोध लागलेला नाही. पडघा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल असून पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. वरुण पाटील हे सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला असून वरुण पाटील यांनी त्यांच्यावरील आरोपांचे खंडण केले आहे.
इताडे गावातील अनिल पाटील दोन वर्षांपासून त्यांचा भाऊ संतोषच्या शोधात आहेत. २२ आॅगस्ट २०१६ रोजी संतोष कामानिमित्त उल्हासनगरला गेला होता. त्यानंतर, तो घरी परतलाच नाही. त्याची दुचाकी पश्चिमेतील प्रेम आॅटो परिसरात आढळली. पाटील कुटुंबीयाच्या आरोपानुसार, सावद गावातील २७ गुंठे जागा विकत घेण्यासाठी भाजपा नगरसेवक पाटील आणि त्यांचे साथीदार संतोषला भिवंडी येथील रजिस्टेÑशन कार्यालयात घेऊन गेले. मात्र, २७ ऐवजी ६६ गुंठे जागा वरुण आणि त्याच्या साथीदारांनी आपल्या नावावर करून घेतली. संतोषने याला विरोध केला असता आरोपींनी त्याचे अपहरण केले. या घटनेला दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. अजूनही संतोषचा शोध लागला नाही. वरुण याच्यासह त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल झाला असला, तरी राजकीय प्रभावामुळे पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याचा आरोप अनिल पाटील यांनी केला आहे.
भाजपा नगरसेवक वरुण पाटील हे सत्तेचा दुरुपयोग करून नागरिकांची लूट करत आहेत. अशा अनेक लोकांची फसवणूक झाली आहे. आम्ही पोलीस ठाण्यात जातो, तेव्हा पोलीस तपास सुरू असल्याचे सांगतात. या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही हे प्रकरण समोर आणले आहे.
- विनया पाटील, पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस
पाटील कुटुंबाने ज्याला कुलमुखत्यारपत्र दिले होते, त्याच्याकडून ही जागा कायदेशीररीत्या विकत घेतली आहे. कुणाचीही फसवणूक केली नाही. ज्या माणसाचे अपहरण केल्याचा आरोप माझ्यावर आहे, त्याला मी कधी भेटलोही नाही. माझी बदनामी करण्याचा हा डाव आहे.
— वरुण पाटील, भाजपा गटनेते, केडीएमसी