विरारच्या खाकी वर्दीची सहृदयता, कोर्टही धावले मदतीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 03:09 AM2018-08-03T03:09:25+5:302018-08-03T03:09:35+5:30
जिने सर्वासाठी आयुष्यभर कष्ट सोसलं, स्वत:च्या पोटाला चिमटा देऊन लेकरांची पोट भरली आज तिलाच पोटाची खळगी भरण्यासाठी भिक मागावे लागत आहे. तिचा गुन्हा एवढाच की तिला दुर्धर आजाराने विळखा घातला होता.
- हनीफ पटेल
विरार : जिने सर्वासाठी आयुष्यभर कष्ट सोसलं, स्वत:च्या पोटाला चिमटा देऊन लेकरांची पोट भरली आज तिलाच पोटाची खळगी भरण्यासाठी भिक मागावे लागत आहे. तिचा गुन्हा एवढाच की तिला दुर्धर आजाराने विळखा घातला होता. त्यामुळेच तिच्या घरच्यांनी तिला वाऱ्यावर सोडलं. याचा इतका आघात तिच्या वर झाला की तिच्या स्मृतींनीही आता तिची साथ सोडली आहे. त्यामुळे लोक तिला आता वेडी म्हणत आहेत.
ही कहाणी आहे, एका ७५ वर्षीय म्हातारीची. ती कुठून आली, ती कुठली, तिचे नातेवाईक कोण, तिचे नेमके नाव काय या कोणत्याही प्रश्नाचे तिच्याकडे कोणतही उत्तर नाही. आणि जे समोर आहे ते इतकं विदारक आहे की तिला कोणी स्वीकारत ही नाही. तिला इतक्या विकारांनी ग्रासलं आहे की आता तिच्यावर कुणी उपचार करायला सुद्धा तयार होतं नाही.
ही म्हातारी विरार पोलिसांना रस्त्यावर सापडली. मृत्यूच्या शयेवर ती आपले अंतिम श्वास घेत होती. तिच्या सर्वांगावर जखमा होत्या त्यातून रक्त वाहत होते. तिचे कपडे फाटले होते. ती भिक मांगत होती. विरार पोलिसांनी तिला पोलीस ठाण्यात आणलं तिच्यावर उपचार सुरू केले. तिला खाऊ पिऊ घातले.तिची वैद्यकीय तपासणी ही केली त्यावेळी कळले की तिला दुर्धर आजारानं ग्रासले आहे. पोलिसांना वाटले की तिला उपचार मिळाल्यास ती बरी होईल. पण तिला कोणतेही रुग्णालय दाखल करून घेण्यास तयार झाले नाही. त्यांनी तिला स्थानकात ठेऊन तिच्यासाठी एक महिला व पुरूष पोलीस तैनात ठेवला. चार दिवस तिची शुश्रशा केली. शेवटी कोणीच तिला ठेवण्यासाठी तयार नसल्याने पोलिसांनी न्यायालयाचे दार ठोठावले. न्यायालयाने ठाणे सिव्हील रुग्णालयाला तिच्यावर उपचार करण्याचे आदेश दिले.
तपासाअंती तिची बडबड ठरली व्यर्थ
विरार पोलिसांची ही माणुसकी खरोखरच आदर्शवत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार ही महिला आपलं नाव पुष्पलता सावंत असल्याचे सांगते आहे. मी दादर ला राहत असून मला तीन मुलं आणि एक मुलगी असल्याचे व माझे पती शिक्षक होते असेही ती सांगते. पण ही माहिती पोलिसांनी तपासून पाहिली असता अशा प्रकारचा कोणताही परिवार आढळून आला नाही. यामुळे जर बातमीच्या माध्यमातून या महिलेचे कुणी नातेवाईक सापडले तर त्यांनी तिला ठाणे सिव्हिल हॉस्पिटल मध्ये जाऊन भेटावे. असे आवाहन पोलिसांनी केले आहे.