जनतेच्या समस्या जाणून घ्या, वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 11:48 PM2019-07-30T23:48:49+5:302019-07-30T23:49:03+5:30
महासचिव अरूण सावंत : वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा
डहाणू : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघाच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी डहाणू पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आला होता. तळागाळातील लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या दूर करण्यासाठी न्यायाचा लढा उभारला पाहिजे, असे आवाहन वंचितचे महासचिव अरुण सावंत यांनी यावेळी केले. जिल्हाध्यक्ष गणेश प्रधान, वंचितचे लोकसभा उमेदवार सुरेश पाडवी, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सावंत यांनी वंचित भारिपची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, सर्व समाज घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र आले पाहिजे. बहुजन समाजाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. त्यांचा विचार करून सर्वांना संवैधानिक न्याय मिळवून दिला पाहिजे. कार्यकर्त्यांनी साखळी पध्दतीने पक्ष वाढीसाठी काम करण्याची तयारी केली पाहिजे, असे सांगत त्यांनी शासनाच्या सदोष धोरणांवर टीका केली. जिल्हा अध्यक्ष गणेश प्रधान यांनी पक्ष वाढविण्यासाठी, शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत करण्याबाबत मार्गदर्शन केले.
अॅड.विराज गडग यांनी आदिवासी चळवळ, राज्यघटनेतील ५ वी व ६ वी अनुसूची यावर विचार मांडले. संविधानाची शपथ घेणारे लोकप्रतिनिधीच अनेकदा संविधानातील तत्त्वांची पायमल्ली करत आहेत, असे लोकप्रतिनिधी हे देशद्रोही असल्याची सडकून टीका करताना पालघर विधानसभा निवडणूक लढण्याचा मनोदय व्यक्त केला. चिंतामण मोहंडकर यांनी १९४८ चा कुळवहिवाट जमीन कायदा, १९७२ चा आदिवासी वन अधिकार कायदा, तसेच २०१० चा जल वितरण विधेयक या तीन कायद्याच्या तरतुदी सांगताना शासनाने आदिवासी समाजाला जमीन, जंगल व जल यापासून कसे दूर करण्याचा प्रयत्न केला जातो याबद्दल विचार मांडले. या कार्यक्रमात डहाणूतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी वंचितमध्ये प्रवेश घेतला. वसई, विरार, नालासोपारा, भिवंडी, ठाणे, वाडा, तलासरी, विक्र मगड, पालघर, डहाणू, जव्हार, मोखाडा, बोईसर या भागातील भारिप वंचितचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.