कोकणेर ते पांजरा रस्त्याचे प्रकरण शेक णार : भ्रष्ट ठेकेदार अन् अभियंता अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 01:30 AM2018-08-17T01:30:22+5:302018-08-17T01:30:37+5:30
ठेकेदार मे. राहुल अ. पाटील यांनी बांधलेला कोकणेर-सागावे-गीरनोली-खुताड पांजरा हा रस्ता अवघ्या काही महिन्यातच उखडला असून बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराचे एक मूर्तिमंत उदाहरण ठरले आहे.
- हितेन नाईक
पालघर : ठेकेदार मे. राहुल अ. पाटील यांनी बांधलेला कोकणेर-सागावे-गीरनोली-खुताड पांजरा हा रस्ता अवघ्या काही महिन्यातच उखडला असून बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराचे एक मूर्तिमंत उदाहरण ठरले आहे. ही परिस्थितीत बदलण्यासाठी ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्यांसह ग्रामस्थांनी ही केली आहे.
जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्याची याआधी असलेली दुरवस्था पाहून येथील सदस्य कमळाकर दळवी यांनी हा रस्ता बांधण्यात यावा असा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे ठेवला होता. त्याला प्रतिसाद देत जिल्हा परिषदेने हा रस्ता ५०५४ लेख शिर्षांतर्गत २०१६-१७ ला मंजूर केला व ६४६ मीटर लांबीच्या या रस्त्याची अंदाजपत्रकीय रक्कम सुमारे २० लाख इतकी ठरवली गेली. त्यानुसार निविदा प्रक्रि या राबवून हे काम मे. विशाल पाटील यांना देण्यात आले. या कामाचे संपूर्ण अंदाजपत्रक सहायक अभियंता हेमंत भोईर यांनी तयार करीत हा रस्ता मे महिन्यात बांधून पूर्णही करण्यात आला. मात्र, रस्त्याचा दर्जा राखण्यात ठेकेदाराने व अभियंता भोईर यांनी पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे पहावयास मिळत आहे. पहिल्या पावासातच या रस्त्याची झालेली चाळण पाहता ठेकेदार, काही लोकप्रतिनीधी आणि अधिकारी यांच्या टक्केवारीच्या अर्थकारणात सापडलेला हा निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचे उदाहरण म्हणून देता येईल.
या रस्त्यावरून येथील कोकणेर, सागावे, गीरनोली, खुताड व पांजरा गावातील शेकडो ग्रामस्थ दररोज प्रवास करीत आहेत. नवीन रस्ता तयार झाल्यानंतर आपला प्रवास सुखकर होईल या अपेक्षांचा काही दिवसातच भंग झाल्याचे त्यांना पहावयास मिळाले. सध्या त्यांना या रस्त्यावरून प्रवास करताना अनेक कसरती कराव्या लागत आहेत. तसेच, विद्यार्थी, वयोवृद्ध, रु ग्ण यांचे या खड्डेमय रस्त्यामुळे पुन्हा हालअपेष्टा ना सामोरे जावे लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ जिल्हा परिषद, लोकप्रतिनिधींच्या नावाने बोटे मोडत आहेत. या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट पणे करण्यात आल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतरही ठेकेदाराच्या रस्त्याच्या बिलाचे पैसेही रस्त्याच्या गुणवत्तेची कुठलीही शहानिशा न करता ठेकेदार विशाल पाटील यास अदा करण्यात आले आहे. त्यामुळे बांधकाम विभागात सुरू असलेली अभद्र युती किती भक्कम आहे याचे उत्तम उदाहरण या प्रकरणातून पहावयास मिळते. विशेष म्हणजे या रस्तावर अनेक खड्डे पडून रस्ता दबल्याने हा रस्ता निकृष्ट असल्याचे दिसत असतानाही तो योग्य असल्याचा दाखलाही जिल्हा परिषदेच्या पालघर उपविभाग उप अभियंता यांनी दिल्याने बांधकाम विभागात भ्रष्टाचाराची किती पातळी खालावली आहे हे दिसून येते.
अलीकडेच बांधकाम झालेला या रस्त्यावरचा डांबराचा थरच धुवून गेला असून निकृष्ट दर्जा व निष्काळजीपणामुळे या रस्त्यांनी काही महिन्यातच दुरावस्था झाल्याचे दिसते. शासनाचा निधी पाण्यात बुडविण्याचे काम ठेकेदारासह अभियंता भोईर याने केल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. ठेकेदार हा रस्ता निकृष्ट दर्जाचे बांधकाम करीत असताना अभियंतानी त्याच्या निदर्शनास ही बाब आणणे गरजेचे होते.
या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याला उत्तम दर्जाचे प्रशस्तीपत्रक प्रशासनाने देऊन टाकले आहे. याप्रकरणी ठेकेदार विशाल पाटील व अभियंता भोईर यांच्याविरु द्ध कठोर कारवाई करून या ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या सभेत कमळाकर दळवी यांनी ठेवला असल्याचे सांगितले.
ठेकेदार आणि कनिष्ठ अभियंता या दुरावस्थेला जबाबदार आहेत. हा रस्ता ठेकेदाराने पुन्हा बांधावा अशी मागणी आहे.
- राजेंद्र पाटील,
उपसरपंच, सागावे
ठेकेदार व अभियंता यांनी विश्वासात न घेता हे काम केले आहे. तशी तक्र ारही मी दिली आहे. हा रस्ता योग्य पद्धतीने पुन्हा बनवून द्यावा.
कमळाकर दळवी,
जिल्हा परिषद सदस्य
या रस्त्याचे काम खराब झाले असून संबधीत ठेकेदाराकडून ते पुन्हा करुन घेण्यात येईल. तसेच कनिष्ठ अभियंता हेमंत भोईर याच्यावर कारवाई करु.
- एस. इ. धुमाळ, कार्यकारी अभियंता, जि.प. पालघर