कोकण पर्यटनवाढीस वाव
By admin | Published: June 28, 2017 03:06 AM2017-06-28T03:06:09+5:302017-06-28T03:06:09+5:30
निसर्ग संपदेने नटलेल्या कोकणातील पर्यटनाला मोठा वाव असून त्या माध्यमातून संपूर्ण कोकणाचा पर्यटन विकास साधण्याच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : निसर्ग संपदेने नटलेल्या कोकणातील पर्यटनाला मोठा वाव असून त्या माध्यमातून संपूर्ण कोकणाचा पर्यटन विकास साधण्याच्या दृष्टीने कोकण विकास पर्यटन उद्योग संघाच्या शिष्टमंडळाने पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची भेट घेतली. यावेळी पर्यटन वाढी संदर्भात मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
कोकण पर्यटन उद्योग संघाचे अध्यक्ष माधव भंडारी, उपाध्यक्ष नरेश पेडणेकर, सरचिटणीस संजय यादवराव, पालघर जिल्हा प्रतिनिधी आशिष पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी रावल यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी कोकणातील भूभाग हा निसर्ग संपदेने नटलेला असून स्वच्छ, सुंदर समुद्र किनारे, नारळी-पोफळीच्या बागा, शिवकालीन दुर्ग, चिकू, केळी, नारळ, आंबा, स्ट्राबेरीच्या बागा, पापलेट-सुरमई, कोळंम्बी, दाढा, बोंबील इ. मत्स्यसंपदा, मुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकणाकडे आकर्षित होत असतात. मात्र पर्यटन वाढीच्या दृष्टीने लागणार्या अत्यावश्यक सेवा व सुविधा नाहीत त्या शासनाकडून पुरवल्या गेल्यास मोठा महसूल शासनाला मिळून ग्रामीण भागात रोजगाराच्या चांगल्या संधी निर्माण होणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी मंत्र्याच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी निसर्गरम्य कोकणच्या पर्यटन वाढीसाठी पर्यटन विभागाने विशेष प्रयत्न चालविले असून एअर बी एन बी या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत करार केल्याची माहिती रावल यांनी दिली. या संस्थे बरोबर करार केल्याने जगातील १९० देशातील एअर बी एन बी संस्था कोकण पर्यटनाचे मार्केटिंग करताना न्याहारी निवास प्रकल्पाच्या मार्केटिंगवर भर देणार आहे. यामुळे कोकणातील समुद्रकिनाऱ्यावरील गावागावात दोन हजार पर्यटन केंद्रे जागतिक दर्जाच्या निकषाप्रमाणे तयार करण्यात येणार असून त्याचे व्यवस्थापन दर्जेदार राहील याकडे संस्था विशेष लक्ष पुरवणार आहे, असे दोन हजार प्रकल्प उभे राहण्याच्या दृष्टीने कोकण पर्यटक उद्योग संघ समन्वयाची भूमिका बजावणार आहे. यामुळे पर्यटनाचे विकेंद्रीकरण होऊन गावागावात पर्यटन उद्योग सुरु होऊन स्थानिकांसाठी रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार असल्याचा विश्वास संघाचे अध्यक्ष माधव भंडारी यांनी व्यक्त केला.
कोकणातील प्रमुख ५० गावांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत प्राथमिक स्तरावर विचार करू अशी ग्वाही पर्यटनमंत्री रावल यांनी शिष्टमंडळाला यावेळी दिली. याबाबत पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.