कुडूसला पावसाने झोडपले
By admin | Published: October 15, 2015 01:32 AM2015-10-15T01:32:16+5:302015-10-15T01:32:16+5:30
वादळ व वीजांच्या कडकडाटासह मंगळवारी संध्याकाळी कोसळलेल्या पावसाने कुडूस परिसराला अक्षरश: झोडपून काढले. या वादळात अनेक घरांची छपरे उडाली तर विजेचे खांब तसेच झाडे उन्मळून पडलीत
वाडा : वादळ व वीजांच्या कडकडाटासह मंगळवारी संध्याकाळी कोसळलेल्या पावसाने कुडूस परिसराला अक्षरश: झोडपून काढले. या वादळात अनेक घरांची छपरे उडाली तर विजेचे खांब तसेच झाडे उन्मळून पडलीत. या पावसामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर पाऊस सुरू झाल्यापासून वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल झाले.
चिंचघर, मांगाठणे, नारे, या गावांतही काल वीजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाल्याने परिसरात मोठे नुकसान झाले आहे. महावितरणचे जवळपास १० विजेचे खांब पडले. त्यामुळे परिसरात वीजपुरवठा खंडित झाला. तो सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बुधवारी रात्रीपर्यंत वीजपुरवठा सुरू होईल, असे कनिष्ठ अभियंता कांबळे यांनी सांगितले.
कुडूस गावातील रजिवान सुसे यांच्या १६ खोल्यांची छपरे पूर्णपणे उडाल्याने तेथे राहणाऱ्या नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. यात बिस्मिल्ला मिर्झा यांच्या पाठीवर पत्रा पडून ते जखमी झाले आहे. रजिवान सुसे यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर, याच गावातील रामदास जाधव यांच्या पाच खोल्यांचे पत्रे पूर्णपणे उडाल्याने त्यांचेही बरेच नुकसान झाले आहे.
मांगाठणे येथील विजय पाटील यांच्याही घराचे छप्पर उडाल्याने त्यांच्यावरही बेघर होण्याची वेळ आली आहे. यात त्यांचेही नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे व्हावेत व त्यांना सरकारने भरपाई द्यावी, अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.
(वार्ताहर)