आॅनलाइन घोळाने घरकुल लाथार्थी हप्त्यापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 02:50 AM2018-02-08T02:50:03+5:302018-02-08T02:50:09+5:30
१६ ग्रामपंचायतीतील लाभार्थ्यांच्या प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाचे काम पूर्ण होवून दोन वर्ष झालीत. तरीही आॅनलाइनच्या घोळामुळे त्यांना घरकुलाचा शेवटचा हप्ता मिळालेला नाही.
- हुसेन मेमन
जव्हार : तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीतील लाभार्थ्यांच्या प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाचे काम पूर्ण होवून दोन वर्ष झालीत. तरीही आॅनलाइनच्या घोळामुळे त्यांना घरकुलाचा शेवटचा हप्ता मिळालेला नाही. त्यासाठी त्यांना वारंवार पंचायत समितीत खेटे मारावे लागत आहेत.
सन-२०१५-१६ मधील जव्हार तालुक्यातील प्रधानमंत्री घरकुलच्या १६ लाभार्थ्यांना इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरकुले मंजूर झाली. त्यांचे बांधकामही करण्यात आले. त्यासाठी लाभार्थ्यांनी विट्ट, रेती, सिमेंट, दगड असे साहित्य उधारीवर घेतले आहे. तसेच मेस्त्री आणि मजुरांची मजुरी उधारी उसनवारीतून देऊन दोन वर्षापूर्वी आपले घरकुल कसेबसे पूर्ण केले आहे. मात्र त्यांना शेवटचा हप्ता मिळत नसल्याने ते मेटाकुटीला आले आहेत. त्यांनी अनेक वेळा चकरा मारूनही आॅनलाइनच्या घोळामुळे हा हप्ता जमा झालेला नसल्याने, लाभार्थ्यांंना अनेक अडचणीना तोंड द्यावे लागते आहे. प्रधानमंत्री घरकुल योजनेतील १६ लाभार्थ्यांंना पहीला हप्ता मिळाला आहे. त्यानंतर घरकुले पूर्ण झाली आहेत. तरीही त्यांच्या खात्यावर शेवटचा हप्ता जमा झालेला नाही.
>प्रधानमंत्री घरकुल योजनेतील त्या 16 लाभार्थ्यांंच्या बँक अकाऊंटमध्ये अडचण निर्माण झाली होती. त्या घरकूल लाभार्थ्यांची घरकुलाचा रखडलेला शेवटचा हप्त्याचा प्रस्ताव डीआरडी कोकण विभाग मुंबई यांच्याकडे पाठवला आहे. त्याच्या म्हण्यानुसार त्या लाभार्थ्यांचा हप्ता दोनच दिवसात जमा होईल.
- राहुल म्हात्रे, जव्हार पंचायत समिती गटविकास अधिकारी
आम्ही गेल्या दोन वर्षापासून घरकुलाचा शेवटचा हप्ता मिळण्यासाठी पंचायत समतिीकडे जात आहेत. मात्र घरकुलाचा हप्ता जमा झालेला नाही. हप्ता आज होईल, उद्या होईल अशी दोन वर्ष निघून गेली तरीही घरकुलाचा हप्ता जमा नसल्याने आम्हला उधारी वाल्यांनी तगादा लावला आहे.
- विजय सखाराम वझरे, प्रधानमंत्री घरकुल लाभार्थी.