रुग्णवाहिकेत महिला प्रसूत, दोघेही सुखरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 11:07 PM2018-10-31T23:07:07+5:302018-10-31T23:07:35+5:30
१०८ च्या कर्मचाऱ्यांचे प्रसंगावधान; पाच वर्षांत ७५ हजार ८३३ रुग्णांनी घेतला लाभ
नालासोपारा : केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात आपत्कालीन वैधकीय सेवा पुरविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेत कुडूस येथील एका मातेने बाळाला जन्म दिला. बाळ बाळंतीण दोघेही सुखरुप आहेत.
प्रसूती अवघड झालेली एक महिला कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल होती. त्यातून कॉल आल्यानंतर रुग्णवाहिकेने तिला ठाणे सिव्हिलमध्ये दाखल करण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली. तिला वेणा अनावर झाल्याने रुग्णवाहिकेतील कर्मचाºयांनी प्रसंगावधान राखून तिची रुग्णवाहिकेतच प्रसूती घडविली.
ही घटना पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील चांबळे या गावची आहे. शनिवारी दुपारी १.३० च्या सुमारास आलेल्या कॉल नुसार क्र मांक एम एच १४ सी एल १४१६ हि १०८ ची रुग्णवाहिका कर्मचाºयांसह वाघे परिवाराच्या घरी पोहचली. व तेथून जीवघेण्या वेदनेने विव्हळणाºया वृषाली रोशन वाघे यांना भिवंडीतील इंदिरा गांधी रु ग्णालयात पोहचवले . मात्र तेथील डॉक्टर्सनी तिची गंभीर अवस्था लक्षात घेऊन तिला लवकरात लवकर ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्याप्रमाणे ती ठाणे येथे जात असता कल्याण नाका येथे तिची तब्येत जास्त अवघड झाली. त्यामुळे रुग्णवाहिकेत असलेल्या डॉक्टर प्रज्ञा इंगळे यांनी चालक प्रमोद घोडविंदे यांना रुग्णवाहिका थांबवायला सांगून उपचार सुरु केले. त्यांना साथ देत वृषालीने ३ किलोच्या एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळ व बाळंतीण दोघेही सुखरूप असून त्यांना कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आले आहे. १०८ रुग्णवाहीका कर्मचार्यांच्या प्रसंगावधानामुळे व त्यांनी अवघडलेल्या मातेची सुखरूप प्रसूती केल्याने त्यांचे या भागात कौतुक होत आहे .
लाभ घेण्याचे आवाहन
या १०८ रुग्णवाहिका मोफत सेवेचा मागील पाच वर्षांंत पंच्याहत्तर हजार आठशे तेहतीस रुग्णांनी लाभ घेतला आहे . त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांनी १०८ वर संपर्क करण्याचे आवाहन मांडवी कार्यालयातील रुग्णवाहिका पर्यवेक्षक मिलिंद कांबळे यांनी केले.