‘त्या’ समुद्रकिनाऱ्यावर भूमाफियांची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 01:06 AM2020-11-23T01:06:23+5:302020-11-23T01:06:42+5:30
सीआरझेडमधील सरकारी मोकळ्या जमिनीवर अतिक्रमण झाल्याचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
डहाणू : तालुक्यातील नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या चिंचणीच्या नयनरम्य समुद्रकिनाऱ्यावर भूमाफियांची नजर पडली आहे. गावातील काही व्यक्ती आणि चिंचणी ग्रामपंचायतीमधील एका पदाधिकाऱ्याच्या संगनमताने समुद्रकिनाऱ्यावरील सीआरझेडमधील सरकारी मोकळ्या जमिनीवर अतिक्रमण करून तिची प्रतिगुंठा चार लाख रुपयेप्रमाणे विक्री सुरू असल्याने ग्रामस्थांनी आचर्य व्यक्त केले आहे. याची जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
चिंचणी समुद्रकिनाऱ्यावरील सीआरझेडमध्ये असलेल्या सरकारी जमिनीवर ग्रामपंचायतीमधील एका पदाधिकाऱ्याच्या संगनमताने भूमाफियांनी सरकारी मोकळ्या जागेवर घर न बांधताच त्यावर घरपट्टी आकारून ही जागा हडप करण्यास सुरुवात केली आहे. ही जागा प्रतिगुंठा चार लाख रुपयेप्रमाणे विक्री करून जेसीबीच्या साह्याने या जागेवर धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्याच्या नावाखाली खोदकाम सुरू असल्याचे उघडकीस आले आहे.
विशेष म्हणजे चिंचणी खाडीनाका ते वाणगावनाका दरम्यान रस्त्याला लागून मोठमोठ्या इमारतींची संकुले बांधली जात आहेत. यासाठी कोणत्याही सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता केवळ ग्रामपंचायतीच्या परवानगीने या इमारती उभ्या केल्या जात आहेत. यावर महसूल विभागाने तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
मोकळ्या जागेवर घरपट्टी?
डहाणू तालुक्यातील चिंचणी येथील नयनरम्य समुद्रकिनाऱ्यावरील सीआरझेड परिसरामध्ये असलेल्या सरकारी जमिनीवर ग्रामपंचायतीमधील एका पदाधिकाऱ्याच्या संगनमताने भूमाफियांनी सरकारी मोकळ्या जागेवर घर न बांधताच त्यावर घरपट्टी आकारून ही जागा हडपण्यास सुरुवात केली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
चिंचणी समुद्रकिनाऱ्यावर अतिक्रमण केल्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे. या ठिकाणी सरकारी जागेवर अतिक्रमण झालेले नसून तसा प्रकार उघडकीस आल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई केली जाईल.
- राहुल सारंग, तहसीलदार, डहाणू