‘ती’ जमीन बांधकाम खात्याकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 11:34 PM2018-12-03T23:34:42+5:302018-12-03T23:34:56+5:30
एनपीसीआयएलने कोर्टात दावा सुरू असल्याचे सांगून मज्जाव केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेल्या विनंती नुसार ही जमीन जिल्हा शल्यचिकित्सक (पालघर) यांनी सा. बा. खात्याकडे सुपूर्द केल्याने आता सा. बा. खाते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बोईसर : येथील प्रस्तावित ग्रामीण रुग्णालयाच्या जागेवर संरक्षक भिंत बांधण्यास एनपीसीआयएलने कोर्टात दावा सुरू असल्याचे सांगून मज्जाव केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेल्या विनंती नुसार ही जमीन जिल्हा शल्यचिकित्सक (पालघर) यांनी सा. बा. खात्याकडे सुपूर्द केल्याने आता सा. बा. खाते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संरक्षक भिंत बांधणारे ठेकेदार मे. शिवसाई कन्स्ट्रक्शन यांनी या जागेवर काम करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली असता एनपीसीआयएलने कामास मज्जाव केला. नंतर सा. बां. उपविभाग पालघर विभागाच्या उप विभागीय अभियंत्यांनी पालघरच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र पाठवून आपल्या स्तरावरून बांधकामासाठी योग्य ती कार्यवाही करून ही जागा या कार्यालयाच्या ताब्यात देवून त्याचे सीमांकन प्रत्यक्ष जागेवर आपल्या विभागामार्फत करून द्यावी अशी विनंती केली होती. त्या विनंती पत्रानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी १ डिसेंबर १८ रोजी सा. बां. ला पाठविलेल्या पत्रात जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती पालघर यांचे प्रशासकीय आदेशा नुसार ग्रामीण रुग्णालय बोईसर येथील सर्व्हे क्रमांक १०८ ए/३० पैकी २.५० एकर जागेवर संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यास परवानगी देण्यात आली असून त्यानुसार आपणास निधी वितरीत करण्यात आलेला आहे तरी सदर जागेवर बांधकाम करण्यासाठी या कार्यालयाकडून उपरोक्त जागा सुपूर्द करण्यात येत असून काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी विनंती वजा सूचना केली आहे. या पार्श्वभूमीवर आजची ही घडामोड महत्वपूर्ण ठरली आहे. आतातरी या कामाला गती मिळावी, अशी येथील जनतेची इच्छा आहे.
>आता कामाला गती
२००३ साली बोईसर ग्रामीण रुग्णालय मंजूरझाल्या नंतर मागील १५ वर्ष हा प्रश्न विविध खात्याच्या लाल फितित अडकून पडण्या बरोबरच न्यायालयातही गेल्याने प्रलंबित आहे त्यामुळे हजारो गोर गरीब मोफत व सुसज्ज सेवे पासून इतकी वर्षे वंचित आहेत.
आता चेंडू सार्वजनिक बांधकाम खात्याकडे असून ते बांधकाम सुरु करतात की नाही या बरोबरच काम पुन्हा सुरु केल्या नंतर एनपीसीआयएलची भूमिका काय असणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.