‘ती’ जमीन अखेर ठरली गावचीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 05:59 AM2019-01-11T05:59:59+5:302019-01-11T06:00:09+5:30
बळकाविण्याचा डाव फसला : तलाठी, उपलेखापाल यांना कारणे दाखवा, कारवाई प्रस्तावित
पालघर : माकूणसार येथील गट नंबर १८० मधील सुमारे आठ एकर जमिनीच्या सातबाऱ्यावर तहसील कार्यालयातील उपलेखापाल व तत्कालीन तलाठ्याने सुनील गोकर्ण दुबे यांच्या नावे पीकपाणी चढवून जमीन बळकाविण्याच्या प्रयत्नाविरोधात ग्रामस्थांनी उभारलेल्या लढ्याला यश मिळाले आहे. प्रांताधिकाºयांनी पीकपाणी आदेश रद्द करून दोन्ही महसूल कर्मचाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
माकूणसार येथील गट नंबर १८० मधील ३.०१.५, पोट खराबा ०.१०.५ हेक्टर आर जमिन गंगाधर ग दांडेकर, विश्वनाथ ग.दांडेकर यांच्या नावावर असून ते दोघेही मयत आहेत. त्यामुळे या जमिनीचा कुणीही हक्क सांगण्यास पुढे येत नसल्याने या भूखंडाच्या आत येणारे खाडीचे पाणी अडवून त्याचा वापर ग्रामस्थ क्रिकेट खेळण्यासाठी अनेक वर्षांपासून करीत होते. परंतु सुनील दुबे यांनी या जमिनीवर माझा हक्क असून महसूल विभागाने वरील भूखंडाच्या सातबाºयावर माझ्या नावाने पीकपाणी चढविले असल्याचे सांगून या जागेवर बांध घालून कंपाउंड घातले होते.
या जमिनीवर मागील २०-२५ वर्षांपासून खाडीचे पाणी शिरून ती नापीक झाल्याने व त्यावर काही महिने ग्रामस्थ क्रि केट खेळत होते. मागील अनेक वर्षांपासून कधीही कुणीही तिथे शेती करीत नसल्याचे ग्रामस्थाचे म्हणणे होते, असे असताना अचानक तहसीलदार कार्यालयातील कुळवहीवाट शाखेचे उपलेखापाल व तत्कालीन तलाठी रत्नदीप दळवी यांनी महसूल विभागातील काही उच्चपदस्थ अधिकाºयांच्या आशीर्वादाने त्या जमिनीवर सुनील दुबे यांच्या नावाचे पीकपाणी बेकायदेशीररित्या चढविण्याचा प्रताप केला होता.
या प्रकरणात पंचनामे करतांना घेण्यात आलेले साक्षीदारही बोगस होते तर काहींच्या सह्या पूर्व कल्पना न देताच फसवणूकीने घेतल्याचे सत्य या संदर्भातील चौकशीतून समोर आले होते. लोकमतने जे नाही ललाटी, ते लिही तलाठी असे वृत्त प्रसिद्ध करून या प्रकरणाचा पर्दाफाश केला. लोकसभा पोट निवडणुकीवर घातलेल्या बहिष्काराची दखल प्रशासनाला घेणे भाग पडले. उपलेखापाल व तत्कालीन तलाठी यांना कर्तव्यायुतीबाबत कारवाई करण्यात यावी असे आदेश दिले.
मागील अनेक वर्षां पासून ग्रामस्थांची वहीवाट असलेल्या जमिनीवर महसूल कर्मचाºयांनी चुकीने पीकपाणी लावल्याचे सिद्ध झाल्याने ही जमीन पुन्हा ग्रामस्थांच्या ताब्यात द्यावी.
- नागेश वर्तक, ग्रामस्थ