यूपीला गावी पळण्याच्या तयारीत असताना लॅपटाॅपचोर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 11:44 PM2021-05-05T23:44:39+5:302021-05-05T23:45:03+5:30
रेल्वे पोलिसांची कारवाई : चोरलेला मुद्देमाल केला जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : वसई रोड रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नोकरीच्या शोधात असलेल्या एका तरुणाचा लॅपटॉप व मोबाइल फोन चोरणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. महेंद्रकुमार सैनी (३४, रा. अंधेरी) असे या आरोपीचे नाव असून रेल्वे पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेला लॅपटॉप व मोबाइल जप्त केला आहे.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी या घटनेतील आरोपी महेंद्र कुमारने सफाळे येथील एका तरुणाला चांगल्या ठिकाणी नोकरीला लावण्याचे आमिष दाखवले होते. यासाठी त्याच्याजवळ असलेला लॅपटॉप सोबत घेऊन विरार रेल्वे स्थानकात भेटण्यासाठी बोलावले असता तेथे आरोपीने लॅपटॉपवर काम करण्याचा बहाणा करून तक्रारदार तरुणाला झेरॉक्स काढण्यासाठी पाठवले. ही संधी साधून तरुणाचा मोबाइल व लॅपटॉप घेऊन तो पसार झाला होता.
दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने वसई रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रेल्वे स्थानकात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. गुप्त बातमीदारांच्या मदतीने हा आरोपी गावी पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली असता आरोपी बोरीवली रेल्वे स्थानकातून उत्तर प्रदेश येथे जाणाऱ्या गाडीत बसला होता.
मात्र, पोलिसांच्या पथकाने त्याला सोमवारी धावत्या ट्रेनमधून पकडून अटक केली. त्याच्याकडून चोरलेला डेल कंपनीचा लॅपटॉप व रियल मी कंपनीचा मोबाइल, असा एकूण ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन इंगोळे यांनी दिली.