जि.प.च्या शाळेतील खिचडीत अळ्या
By admin | Published: April 10, 2017 05:25 AM2017-04-10T05:25:57+5:302017-04-10T05:25:57+5:30
मोखाडा नजिक असलेल्या तळयाचा पाडा येथील जिल्हा परिषदेच्या जीवन शिक्षण शाळेत तिसरीत शिकणाऱ्या
रविंद्र साळवे /मोखाडा
मोखाडा नजिक असलेल्या तळयाचा पाडा येथील जिल्हा परिषदेच्या जीवन शिक्षण शाळेत तिसरीत शिकणाऱ्या छकुली राजेश तंगवेल या विद्यार्थिनीला दिलेल्या दुपारच्या खिचडीत आळ्या आढळल्याने पालकांत व विद्यार्थ्यांत संताप निर्माण झाला आहे.
शाळेमध्ये दुपारी पोषण आहार म्हणून दिली गेलेली खिचडी छकुली घरी घेऊन आली होती. खाण्यासाठी तिने ती थाळीमध्ये वाढून घेताच त्यात आळ्या असल्याचे पालकांच्या लक्षात आले. त्यांनी ही बाब लोकमतच्या प्रतिनिधीला दाखविली. या शाळेतील विद्यार्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून याला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी छकुलीचे काका संतोष तंगवेल यांनी केली. याबाबत अधिक माहितीसाठी या शाळेचे मुखाध्यापक राजन जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास टाळले.
छकुली दुपारच्या वेळेस खिचडी घेऊन घरी आल्याने हा प्रकार समोर आला यानंतर आम्ही शाळेत जाऊन हा प्रकार सांगितला परंतु भाजीत आळ्या असतील असे शाळेतील शिक्षकांनी सांगितले परंतु वारंवार असे घडत आहे. याकडे कोणीच लक्ष देत नाही.
- राजेश तंगवेल, छकुलिचे वडील
याबाबत चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल.
-किरण कुँवर, शिक्षणाधिकारी, मोखाडा