‘लेटलतीफ’ शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2021 10:40 AM2021-12-28T10:40:49+5:302021-12-28T10:41:03+5:30
School : जिल्हा परिषद शाळांमधील ८० टक्के शिक्षक तालुक्याला निवासी न राहता नाशिक, त्र्यंबकेश्वर येथून ये-जा करतात. यामुळे लेटलतिफ कारभाराचा गाडा नेहमीचाच झाल्याची ओरड पालक वर्गातून केली जात आहे.
खोडाळा : ग्रामीण भागातील प्रत्येक गावपाड्यांमधील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे यासाठी शासन स्तरावर सर्वच मार्गाने प्रयत्न केले जात आहेत. यासाठी शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत, मोफत शिक्षण, मोफत गणवेश, वह्या-पुस्तके, पोषण आहार इत्यादी उपक्रम राबविले जातात; मात्र मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जेथे वेगवेगळे उपक्रम राबविले जातात, तेथे प्राथमिक शिक्षकांच्या लेटलतिफ कामामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे.
बिवलपाडा, दापटी, धामोडी, करोळी, आसे, ब्राह्मणपाडा, कुडवा, धामणी आदी परिसर मोखाडा तालुक्यापासून २० कि.मी. अंतरावर असल्याने या परिसरातील जिल्हा परिषद शाळा सुरू होण्याच्या वेळेच्या १५ ते २० मिनिटे उशिरा येत असून पंधरा मिनिटे लवकर सुट्टी दिली जात असल्याचा आरोप होत आहे. तालुकाभरात जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या १५८ प्राथमिक शाळा असून मोखाडा शहर व खोडाळा बाजारपेठ जवळपासच्या शाळा शालेय वेळेत सुरू होऊन शाळेच्या वेळेत सुट्टी होते, परंतु तालुक्यापासून १५ ते २० किलोमीटर अंतरावरील शाळा पंधरा मिनिटे उशिरा तर सुट्टी पंधरा मिनिटे लवकर होते.
त्यात भर म्हणून आठवड्यातून दोन ते तीन वेळा तालुक्याला मिटिंगा किंवा शालेय माहिती देण्यासाठी यावे लागत असल्याचा ससेमिरा नेहमी शिक्षकांकडून पुढे केला जातो. त्यामुळे शासनाकडून गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या शिक्षकांनी राज्याचे अथवा देशाचे भवितव्य शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्याऐवजी आपली कामाची उपस्थिती भरण्यासाठी तर खटाटोप नाही ना, असा सवाल उपस्थित होत आहे. जिल्हा परिषद शाळांमधील ८० टक्के शिक्षक तालुक्याला निवासी न राहता नाशिक, त्र्यंबकेश्वर येथून ये-जा करतात. यामुळे लेटलतिफ कारभाराचा गाडा नेहमीचाच झाल्याची ओरड पालक वर्गातून केली जात आहे.
पाठीशी घालण्याचा प्रयत्न तर नाही ना?
पालघर जिल्ह्यात मुळात जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या शाळा साडेदहा वाजता सुरू होतात. पाच वाजता शाळांना सुट्टी होत असते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वेळेतील अर्धा तास वाया जात असल्याने जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य शिक्षकांच्या लेटलतिफ कामामुळे धोक्यात आले आहे. असे असतानाही पंचायत समितीचा शिक्षण विभाग या शिक्षकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न तर करत नाही ना, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.