सा.बां.ची लाटली कामे
By admin | Published: July 8, 2016 03:36 AM2016-07-08T03:36:58+5:302016-07-08T03:36:58+5:30
वाडा तालुक्यात ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक अरुण ठाकरे यांनी आपल्या स्वत:च्या मर्जीनुसार नियमबाह्यपणे सार्वजनिक बांधकाम विभागातील विविध कामांचे वाटप करून शासनाचे
- वसंत भोईर, वाडा
वाडा तालुक्यात ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक अरुण ठाकरे यांनी आपल्या स्वत:च्या मर्जीनुसार नियमबाह्यपणे सार्वजनिक बांधकाम विभागातील विविध कामांचे वाटप करून शासनाचे ई टेंडरींग धोरण धाब्यावर बसविले आहे.
शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागातील कामांमध्ये पारदर्शकता यावी म्हणून ३ लाख अंदाज पत्रकीय रकमेपेक्षा अधिक रकमेच्या कामांना इ टेंडरिंग आवश्यक केले आहे. या सरकारच्या निर्णया आधी हे काम वाटप जिल्हा मजूर फेडरेशन करीत असे परंतु ई टेंडरिंगचे धोरण लागू झाल्या पासून मजूर फेडरेशनचे महत्व कमी झाले आहे. त्यामुळे ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक अरुण ठाकरे यांनी आपले महत्व टिकावे म्हणून स्वतंत्र वाडा तालुका ठेकेदार संघटना स्थापन करून तिच्या नावाखाली सार्व जनिक बांधकामच्या कामांचे वाटप सुरू केल्याने शासनाचे धोरणच धाब्यावर बसविले गेले आहे.
यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एन.एस.पालवे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. दरम्यान श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव यांच्याशी संपर्क साधला असता अशा प्रकारे काम वाटप करणे ही एकाधिकारशाही आहे त्यामुळे तालुक्यातील विकास कामांची गुणवत्ता ढासळली असून शासनाच्या ई टेंडरिंग धोरणाची पायमल्ली होत आहे. यात ठराविक ठेकेदारांचे हितसंबंध गुंतले असून ही बेकायदेशीर प्रक्रि या सार्वजनिक बांधकाम खात्याने बंद केली नाही तर या विरोधात श्रमजीवी संघटना तीव्र आंदोलन छेडेल, असे सांगितले. याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनाही साकडे घातले जाणार असल्याचे समजते.
शासनाच्या धोरणाला टाकले ‘खिशात’
शासनाने ई टेंडरिंगच्या माध्यमातून कामांची निविदा प्रक्रि या करतांना स्पर्धा व्हावी व त्यातून कामांची गुणवत्ता राखून पारदर्शकता यावी असा प्रयत्न केला आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्यातील अरुण ठाकरेसारख्या मोठया ठेकेदारांनी संगनमत करून ही कामे आपसात वाटून घेतली आहेत. त्यामुळे ई टेंडरिंग प्रक्रीया केवळ कागदांवर दाखवून स्पर्धा भासविली जात आहे.
ज्या ठेकेदाराला ठाकरेंनी कामाची शिफारस दिली आहे तो आवश्यक तीन एजन्सी कागदोपत्री दाखवून निविदा प्रक्रि या पूर्ण करीत आहेत मात्र प्रत्यक्षात जी स्पर्धा होणे अपेक्षित आहे ती होतांना दिसत नसल्याचे उघड होत आहे. अशा पद्धतीने कामांच्या वाटपाचे फेडरेशनचे संचालक अरुण ठाकरे यांना कोणतेही अधिकार नसतांना ते ही उचापत कोणाच्या आशीर्वादाने करीत आहेत.
वाडा तालुक्यात सुमारे १५० कोटीहून अधिक रकमेची कामे मंजूर असून या कामांचे वाटप अरुण ठाकरे स्वत: शिफारशी देऊन करीत आहेत. ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनचे काम वाटपाचे अधिकार कमी झाल्याने ठाकरेंनी ठेकेदार संघटनेच्या नावाखाली स्वत:चे सत्ताकेंद्र निर्माण करीत आहेत. यामागे त्यांचे हितसंबंध गुंतल्याचे बोलले जात आहे.