वसईच्या शहरी व ग्रामीण भागात 'जनता कर्फ्यु' ला सुरुवात; सकाळपासूनच रस्त्यावर स्मशान शांतता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 01:13 PM2020-03-22T13:13:59+5:302020-03-22T13:18:56+5:30
कोरोना चे सावट वसईच्या शहरी व ग्रामीण भागात 'जनता कर्फ्यु' ला सुरुवात; सकाळपासूनच रस्त्यावर स्मशान शांतता "गर्दी टाळू...या...कोरोना जीवघेण्या विषाणू' ला पळवूया; मॉर्निंग वॉक ,जिम,योगा,शतपावली व सकाळीच चिकन -मटण साठी मार्केटल्या जाणाऱ्या वसईकरांनी रविवारी "जनता कर्फ्यु "म्हणून घराबाहेर काय बाल्कनी व खिडकीत येणे सुद्धा टाळलं आहे."! वसई रोड रेल्वे स्टेशन,नवघर ,आनंदनगर,वसई पूर्व,गोखीवरे,वसई पार नाका, वसई गाव ,नायगाव कोळीवाडा,जेट्टी परिसर,मार्केट आदी भागात प्रचंड शुकशुकाट !
- आशिष राणे
वसई : जभभर थैमान घालणाऱ्या कोरोना-2019 या जीवघेण्या विषाणुच्या संसर्गाचा एकजुटीने लढा देत अंगी संयम बाळगून संकल्प करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी शुक्रवारी रात्री 8 वाजता केलेल्या भावनिक आवाहना नुसार "जनता कर्फ्यू" ला रविवारी वसईच्या शहरी व ग्रामीण भागात सकाळी 7 वाजण्याआधीच शांततेत सुरुवात झाली.
खरं तर सकाळची वेळ आणि त्यात रविवार तरीही लोकं मॉर्निंग वॉक, व्यायाम,जिम,योगा ,शतपावली व फिरायला जाणे याउलट सकाळीच चिकन व मटण साठी मार्केट गाठणे असा दिनक्रम सुरू होतो, मात्र कोरोना चे सावट व त्यात जनता कर्फ्यु मुळे रविवारी सर्वत्र वसईकरांनी घराबाहेर काय तर आपल्या घराच्या बाल्कनी वा खिडकीत सुद्धा येणं टाळलं आहे.त्यामुळे रविवारी सकाळ पासून च वसईच्या शहरी व ग्रामीण भागात अगदी रस्त्यावर, रेल्वे स्टेशनवर व मार्केट भागात स्मशान शांतता पसरली असल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान दिवस उजाडताच गल्ली-गल्लीत, चौकात, नाक्यावर विविध रस्त्यावर, बागेत,उद्यानात आणि खास करून पेपर स्टॉल, चहाची टपरी,उपहारगृह व महामार्ग, रेल्वे स्टेशन वर ठिकठिकाणी होणारी गर्दी दिसून न आल्याने सर्वत्र शुकशुकाट होता, एकार्थाने वसई पूर्णच थांबली आहे. त्यामुळे वसई शहरात सकाळी सात वाजण्यापूर्वीच अघोषित संचारबंदी सुरू झाली होती.
दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, दुकाने, बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश पालघर जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे शनिवार पासूनच बहुतांश ठिकाणी लोकांनी स्वत:हूनच घराबाहेर पडण्याचे टाळले. मात्र आदेशानंतरही ज्यांनी अद्योगिक वसाहती, दुकाने वा आस्थापने बंद ठेवली नाहीत, ती बंद करण्यास शेवटी पोलिसांनी भाग पाडले. त्यामुळे आता वसईच्या शहरे आणि ग्रामीण भागात जणू कालपासूनच लोकांनी बंद सुरू केला. रविवारी सकाळी 7वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंतही जनतेची संचारबंदी स्वयंस्फूर्त असेल, यात वाद नाही.
कोरोना विषाणुचा संसर्ग एकमेकांच्या जवळ जाण्याने होत असल्यामुळेच लोकांनी गर्दी करू नये, एकमेकांच्या जवळ जाऊ नये व घरीच थांबावे, यासाठी देशाच्या पंतप्रधानांनी शुक्रवारी जनता कर्फ्यूची संकल्पना मांडली होती,आता या संकल्पनेस आपण सर्वांनी घरात राहून संयम बाळगून तिला सत्यात उतरवून शेवटी कोरोना ला पळवुन लावू या !