जव्हारमध्ये सोनोग्राफी मशीनचे लोकार्पण
By admin | Published: February 5, 2016 02:33 AM2016-02-05T02:33:13+5:302016-02-05T02:33:13+5:30
आरोहण संस्था आणि सीमेन्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आशा प्रकल्पांतर्गत पतंगशहा ग्रामीण रुग्णालय, जव्हार येथे अद्ययावत सोनोग्राफी मशीन देणगी
हुसेन मेमन, जव्हार
आरोहण संस्था आणि सीमेन्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आशा प्रकल्पांतर्गत पतंगशहा ग्रामीण रुग्णालय, जव्हार येथे अद्ययावत सोनोग्राफी मशीन देणगी स्वरुपात देण्यात आली.त्याचा लोकार्पण सोहळा जव्हार ग्रामीण रुग्णालयात मोठया थाटात आज संपन्न झाला. सीमेन्स हेल्थकेअर, इंडिया चे सी. एफ. ओ. कृष्णन यांनी केले तर प्रमुख अतिथी पालघर सिव्हील सर्जन डॉ. दिनकर रावखंडे हे होते.
जव्हार, मोखाडा व विक्रमगड या तिन्ही तालुक्यातील साधारण साडेचार लाख आदिवासी बहुल अतिदुर्गम तालुक्यांना आरोग्याचा गंभीर प्रश्न सातत्याने भेडसावत आहे. कुपोषण, गरोदर मातांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण, शरीरातील गाठी वा अन्य आजार, गरोदर मातांच्या बालकाचे वजन व वाढ याची सोनोग्राफी वेळीच न झाल्याने, वेळीच निदान व उपचार होत नाहीत. त्यामुळे कुपोषित बालकांच्या मृत्यूचे प्रमाण देखील या तालुक्यात जास्त आहे.
विक्रमगड व मोखाडा रुग्णालयात सोनोग्राफी मशीनच उपलब्ध नाही जव्हार ग्रामीण रुग्णालयाला दोन मशीन मिळाल्या होत्या परंतु तंत्रज्ञ व देखभाली अभावी त्या बंद होत्या परिणामी या तिन्ही तालुक्यातील गोरगरीब जनतेला निदानासाठी ८० ते ९० कि.मी. दूर असलेल्या नाशिक, ठाणे येथील जिल्हा रुग्णालयात जावे लागत होते. दूरचे अंतर व घाट रस्ता यामुळे अनेकांना वाटेतच आपले प्राण गमवावे लागल्याचा अनेक घटना घडल्या आहेत.
मोखाड्याची आरोहण ही आदिवासी भागात काम करणारी संस्था असून तिने आजपर्यंत जवळपास २५०० गरोदर मातांच्या सोनोग्राफी शहराच्या ठिकाणी जावून करवून घेवून त्यांचे प्राण वाचविले. जव्हार सारख्या मध्यवर्ती ठिकाणी सोनोग्राफीची सोय होण्यासाठी त्यांनी शासकीय पातळीवर प्रयत्न देखील केले.त्यात यश न आल्याने आरोहणच्या प्रकल्प अधिकारी श्रद्धा शृंगारपुरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सिमेन्स लिमिटेड चे सेशन यांच्याशी संपर्क साधून १५ लाख रु.किमतीची अद्ययावत २ डी मशीन मिळवून दिली शिवाय डॉ.तुषार पाटील व डॉ.नारायणकर हे सेवाभावी सोनोलॉजिस्ट व सामाजिक बांधिलकीने आठवड्याच्या दर शनिवारी व बुधवारी सेवा देण्यासाठी जव्हार येथे येणार आहेत.
संपूर्ण पालघर जिल्ह्यातील हे एकमेव परिपूर्ण व सुसज्ज असे हे मशीन असणार असल्याची माहिती श्रुंगारपुरे यानी उपस्थिताना दिली.
सदर अनावरण प्रसंगी अप्परजिल्हाधिकारी किशोर तायडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.रामदास म्हराड, माजी नगराध्यक्ष दिनेश भट, जि. प. सदस्य प्रकाश निकम,माजी नगराध्यक्ष राजाराम मुकणे, संस्थेचे कार्यकर्ते व आशा, अंगणवाडी सेविका व तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.