सनसिटी ते स्टेशन बसचा शुभारंभ; महापौरांच्या हस्ते पुन्हा सेवा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 11:17 PM2019-09-11T23:17:01+5:302019-09-11T23:17:14+5:30
कमी प्रतिसादामुळे झाली होती बंद
वसई : वसई रोड स्टेशन ते दिवाणमान व्हाया सनसिटी दरम्यान वसई - विरार शहर महानगरपालिकेची परिवहन सेवा लोकाग्रहास्तव नुकतीच पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मोहरमचे औचित्य साधून मंगळवारी महापौर प्रवीण शेट्टी यांच्या हस्ते या परिवहन बससेवेचे शानदार उद्घाटन सनसिटी येथे करण्यात आले.
महापालिकेने ही परिवहन शहरात सेवा सुरू केल्यानंतर वसई रोड स्टेशन ते दिवाणमान व्हाया सनिसटी या दोन मार्गांवर सेवा देण्यास सुरुवात केली होती. मात्र येथील प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे ही सेवा मधल्या काळात बंद करण्यात आली. नंतरच्या काळात हळुहळू येथे लोकवस्ती वाढल्याने नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीची गरज भासू लागली. पर्यायाने या मार्गावर बससेवा पुन्हा सुरू व्हावी यासाठी येथील नागरिकांनी तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांनी मागणी केली होती. लोकाग्रहास्तव या मागणीला यश आले असून वसई - विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेने मंगळवार संध्याकाळपासून या बससेवेस प्रारंभ केला.
सकाळ तसेच संध्याकाळच्या वेळेत ही बससेवा सुरू राहणार असून दुपारी मात्र या मार्गावरील सेवा बंद राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.