वसईत 'एक कॅमेरा शहरासाठी' योजनेचा शुभारंभ, नागरिकांच्या सुरक्षेसाठी 24 तास वॉच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 07:16 PM2020-11-03T19:16:33+5:302020-11-03T20:16:06+5:30
कौल हेरिटेज सिटी मेन गेट,पंचवटी नाका, दोस्ती,पं.दीनदयाळ नगर व सनसिटी अशा 5 ठिकाणचे डीसीपी संजय पाटील यांच्या हस्ते लोकार्पण
आशिष राणे
वसई - नव्याने वसई विरार पोलीस आयुक्तांलय कार्यान्वित झाल्यावर प्रथमच वसई विरार भागातील जनतेची सुरक्षा अबाधित राहावी व शहरात घडणाऱ्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी मीरा भाईंदर- वसई विरार पोलीस आयुक्तांलयाच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या टप्प्यातील वसई विभागातील पाच ठिकाणी ‘एक कॅमेरा शहरासाठी’ हा उपक्रम राबविण्यात येत असून त्याचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा 4 नोव्हेंबर रोजी बुधवारी दुपारी 4 वाजता पंचवटी नाका येथून होत असल्याची माहिती वसई विरार पोलीस आयुक्तांलय परिमंडळ- 2 चे डीसीपी संजय पाटील यांनी लोकमत शी बोलताना दिली.
दरम्यान सुरुवातीला पालघर जिल्हा पोलीस दलाने या मोहिमेला 2018 मध्ये सुरुवात केली व त्यास आजवर देखील वसईकर नागरिकांचा चांगला व उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.मात्र अजूनही शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यास घडणारे गुन्हे उदा.चोरी,दरोडा, खून,वाहन चोरी,खास करून चेन स्नेचिंग आणि बाल, वृध्द व महिलावर होणारे अत्याचार असे विविध गुन्हे घडू नयेत अथवा त्यास वेळीच प्रतिबंध घालता यावा व पोलीसांना तपास करताना सीसीटीव्ही कॅमेरामुळे आरोपी पकडण्यासाठी मदत व्हावी व गुन्हेगारीला आळा बसावा या उदात्त उद्देशाने शहरात महत्त्वाच्या ठिकाणी "एक कॅमेरा शहरासाठी"हा उपक्रम राबविला जात असल्याचे डीसीपी संजय पाटील यांनी सांगितले.
एकूणच पुन्हा एकदा आयुक्तांलय झाल्यावर प्रथमच वसई विभागात माणिकपूर पोलिस ठाणे हद्दीतील पाच ठिकाणी हे सीसीटीव्ही कॅमेरे चे लोकार्पण होत असून यामध्ये प्रथम वसई अंबाडी रोड पंचवटी नाका,स्टेला येथील दोस्ती कॉम्प्लेक्स विभाग,कौल हेरिटेज सिटी मेन गेट, पंडित दीन दयाळ नगर आणि सनसिटी येथील टेंपो स्टॅण्ड अशा पाच ठिकाणी हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून त्याचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा संपन्न होत असल्याने नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केलं आहे.
"आपले शहर व त्यातील नागरीक अधिक सुरक्षित राहावे,व या सर्वांच्या सुरक्षितेसाठी शहरातील विकासक, रस्त्यावरील दुकानदार, सोसायटय़ा, मॉल, बँका, वसाहती, कार्यालये, शैक्षणिक संस्था आदी यांना सीसीटीव्ही लावण्याचे आवाहन या निमित्ताने आपले पोलीस दल करीत आहे,नक्कीच या उपक्रमामुळे गुन्हेगारीच्या प्रमाणात घट होईल व नागरिकांमध्ये सुरक्षिततेचि भावना ही वाढेल.
डीसीपी संजय पाटील, वसई विरार पोलीस आयुक्तांलय,झोन-2