सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 12:50 AM2019-12-12T00:50:37+5:302019-12-12T00:51:13+5:30

पालघर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला.

Launches Armed Forces Flag Day Fundraising | सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ

Next

पालघर : भारतीय सैन्य दलातील जवान आणि अधिकारी यांचा त्याग, सेवा, बलिदानाप्रती आदरभाव प्रकट करण्यासाठी ध्वजदिन निधी संकलन केला जातो. पालघर जिल्ह्यातील जनतेने या निधी संकलनात जास्तीत जास्त योगदान द्यावे, असे आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी केले.

पालघर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला. या सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्राचाळ जाधव हे उपस्थित होते. तसेच अपर जिल्हाधिकारी दिलीप गुट्टे, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, कृषी अधीक्षक काशिनाथ तरकसे आदी या कार्यक्र मास उपस्थित होते.

देशावर कोणतेही संकट आले तरी आपले वीर सैनिक त्या संकटाचा धाडसाने सामना करतात. शत्रुराष्ट्राशी युद्ध आणि नैसर्गिक व मानवी आपत्ती तसेच दहशतवादी कारवाया यांचा बिमोड करण्यासाठी आपले सैनिक प्राणाची पर्वा न करता धाडसाने लढतात. देशाच्या एकतेसाठी व अखंडतेसाठी जिल्ह्यातील सैनिकांनी सुद्धा योगदान दिले आहे, असे गौरवाद्गार जिल्हाधिकारी डॉ.शिंदे यांनी काढले.

पालघर जिल्ह्यामध्ये १ हजार ११८ माजी सैनिक तर ९६ जवानांच्या विधवा आहेत. या सैनिकांनी आपल्या काळामधील प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले आहे. त्यांनी कधीही आपल्या प्राणाची पर्वा केली नाही. यामुळे आपण देशांतर्गत सुरक्षित जीवन जगत आहोत. या आपल्या तिन्ही दलातील जवानांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच आपण त्याचे काही देणे लागतो या कृतज्ञ भावनेतून त्यांना मदत
करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

माजी सैनिकांचा अथवा त्यांच्या कुटुंबियांचा एक बचत गट तयार करून त्या माध्यमातून त्यांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा मानसही त्यांनी या वेळी व्यक्त केला. तसेच त्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यांच्या बजेटमध्ये तरतूद करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

२०१८ मध्ये जिल्ह्याला मिळालेल्या २३ लाखाच्या उद्दिष्टापेक्षा अधिक उद्दिष्ट (१२३ टक्के) पूर्ण करण्यात आले होते. यावर्षी जिल्ह्याला आलेल्या २८ लाखाच्या उद्दिष्टाची पूर्तताही करण्यात येईल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

----------

Web Title: Launches Armed Forces Flag Day Fundraising

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.