वाढत्या तापमानाने सरपटणाऱ्या प्राण्यांची ‘काहिली’; पालघरमध्ये पकडला सहा फुटी कोब्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 01:25 AM2020-05-05T01:25:05+5:302020-05-05T06:51:54+5:30
शोधताहेत मानवी वस्तीत आसरा घेण्याची जागा
पालघर : वाढत्या तापमानाच्या काहिलीने सरपटणारे प्राणीही हैराण झाले असून थंडाव्यासाठी मानवी वस्तीतील घरांचे आसरे शोधायला सुरुवात केल्याच्या घटना घडत आहेत. पालघरमध्ये एका बंगल्यात शिरण्याचा प्रयत्न करणाºया सहा फुटाच्या कोब्रा जातीच्या सापाला पाळीव बोक्याने रोखून धरले. सर्पमित्रांनी वेळेवर येत त्या कोब्राला पकडून सुरक्षित स्थळी सोडून दिले.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखता यावा यासाठी नगरपरिषदेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी घरातच बसून शहरातील आपला वावर बंद ठेवला आहे. शहरातील पारा ३६ अंश सेल्सियसच्यावर चढल्याने हवेतला वाढता उकाडा पशुपक्ष्यांच्या जीवावर बेतला आहे. त्यामुळे थंड हवेचा आसरा शोधत साप, कोब्रा आदी सरपटणारे प्राणी मानवी वस्तीत शिरू लागले आहेत.
रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास पालघरमधील माहीम रोडवरील समीर मणियार यांच्या ‘सानिया’ बंगल्याच्या गार्डनमध्ये सुमारे सहा फूट लांबीचा कोब्रा शिरून त्याने बंगल्यात शिरण्याचा प्रयत्न सुरू केला. मणियार यांच्या घरातील पाळीव प्राणी छोटू बोक्याचा गुरगुरण्याचा आवाज आल्याने सर्वांचे लक्ष तिकडे गेले. तेव्हा हा अनाहूत पाहुणा कोब्रा फणा काढून त्या बोक्यावर फुत्कारत होता, तर बोकाही त्याच्या अंगावर गुरगरत त्याला बंगल्यात शिरण्यापासून रोखत होता. लगेचच मणियार यांनी तातडीने माहीम रोडवर राहणारे सर्पमित्र सागर बारोट यांना फोन करून बोलावले. त्यांनी शिताफीने हा कोब्रा नागराज पकडला. सर्पमित्र सागर बारोट यांनी गेल्या काही दिवसात पालघर शहरात अनेक साप पकडले असून ते सुखरूपपणे जंगलात सोडल्याचे सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मंडळी घरात असताना सरपटणारी अनेक जनावरे लोकांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे नागरिकांनी सजग राहण्याची आवश्यकता असल्याचे मणियार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
शहरातील अनेक मानवी वस्तींत साप शिरल्याचा कॉल आल्यावर जीवावर उदार होऊन जावे लागते. मात्र, बाहेर पडल्यावर पोलीस तपासणीचा अडथळा येत असल्याने प्रशासनाने अत्यावश्यक सेवा म्हणून आम्हा सर्पमित्रांना शहरात फिरण्यास पास द्यावा.
- सागर बारोट, सर्पमित्र