जन्मदात्याचा विरह बाजूला ठेवून पेपर सोडवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 02:22 AM2018-03-18T02:22:42+5:302018-03-18T02:22:42+5:30
जन्मदात्याचे पहाटेच निधन झाले असताना दहावीतील विद्यार्थीनीने आपले दु:ख तात्पुरते बाजूला ठेऊन शैक्षणिक कर्तव्य बजावण्यासाठी परीक्षा केंद्रावर जाऊन पेपर सोडवला.
वसई : जन्मदात्याचे पहाटेच निधन झाले असताना दहावीतील विद्यार्थीनीने आपले दु:ख तात्पुरते बाजूला ठेऊन शैक्षणिक कर्तव्य बजावण्यासाठी परीक्षा केंद्रावर जाऊन पेपर सोडवला. तिच्यावर आलेल्या दुर्दैवी प्रसंगाबद्दल वसईत हळहळ व्यक्त होत असतानाच तिच्या धैर्याचेही कौतुक केले जात आहे.
वसईतील न्यू इंग्लिश स्कूलची विद्यार्थीनी नेहा पुरुषोत्तम बामनिया यंदा शालांत परिक्षा देत आहे. मात्र, शुक्रवारी तिच्या कुुटुंबावर काळाने पहाटेच घाला घातला. कबुतरखाना परिसरातील म्हात्रे चाळीत राहणाऱ्या नेहाचे वडिल पुरुषोत्तम बामनिया (४५) यांचे शुक्रवारी पहाटे हद्यविकाराच्या झटक्याने आकस्मित निधन झाले. त्यामुळे नेहावर पित्याच्या अवेळी वियोगाचे दु:ख पचवण्याची पाळी आली. तर नेमका शुक्रवारीच तिचा विज्ञान-२ चा पेपर होता. त्यामुळे नेहाला शैक्षणिक कर्तव्य बजावण्यासाठी परीक्षा केंद्रावर वेळेवर हजर राहून पेपर सोडवण्याचा दुर्दैवी प्रसंग ओढवला.
पहाटेच वडिलांचे छत्र हिरावले गेल्याने नेहापुढे मोठे संकट उभे राहिले होते. मात्र. तिने दु:खाला मोठ्या धिराने सामोरे जात विद्यार्थी दशेतील महत्वाचे पर्व वाया न घालवण्याचा निर्णय घेतला. जन्मदात्याचा विरह बाजूला ठेवत नेहा सकाळी बरोबर ११ वाजता परिक्षा केंद्रावर पोचली. त्यानंतर तिने दुपारी १ वाजेपर्यंत पेपर सोडवला. पेपर सोडवून घरी आल्यानंतर मात्र नेहाचा धीर सुटला आणि तिने आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. नेहाने पित्याचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर दुपारी दोन वाजता अंत्यविधी पार पडला. शाळेचे मुख्याध्यापक दोतोंडे यांनी नेहाचे पिता गेल्याचे समजताच तिच्या घरी धाव घेतली होती.
मुख्याध्यापकांनी केले सांत्वन : नेहा आणि तिच्या कुुटुंंबियांचे सांत्वन करतानाच मुख्याध्यापक माणिकराव दोतोंडे यांनी नेहाला पेपर देणे का गरजेचे आहे याचे महत्व घरच्यांना आणि नेहाला पटवून दिले. त्यानंतर तिने परिक्षा केंद्र गाठून दु:ख बाजूला ठेवत पेपर सोडवला. तिच्या या धैर्याचे वसईत कौतुक केले जात आहे.