रानभाज्यांतून मिळते रोगप्रतिकारक शक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 12:08 AM2020-06-11T00:08:55+5:302020-06-11T00:09:12+5:30
कोरोना रोखण्यासाठी ठरतील गुणकारी : कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे वेबिनारद्वारे मार्गदर्शन
अनिरुद्ध पाटील।
बोर्डी : पावसाळ्यात जंगलात उगवणाऱ्या रानभाज्यांमधून मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्व आणि खनिजे असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढून कोरोनाविरु द्धच्या लढ्यात ती उपयुक्त ठरते, अशी कोसबाड कृषी विज्ञान केंद्राकडून वेबिनारद्वारे नागरिकांना माहिती देण्यात आली.
कोसबाड येथील गोखले एज्युकेशन सोसायटीचे कृषी विज्ञान केंद्र , संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालय वसई आणि ग्रामीण विकास अभ्यास मंडळ, मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पावसाळ्यातील रानभाज्यांची उपयुक्तता या विषयावर वेबिनारचे आयोजन केले होते. त्याद्वारे रानभाज्यांचे जतन व संवर्धन करून त्यांचे बारमाही उत्पादन घेऊन व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणे ही गरज असल्याचे प्रतिपादन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी केले. तर या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. विलास जाधव यांनी महाराष्ट्रात आढळणाºया मुख्य रानभाज्या आणि त्यांचे वनस्पतीशास्त्रीय वर्गीकरण स्पष्ट करून रानभाज्यांच्या जनजागृतीबाबत या विज्ञान केंद्राचे योगदान सांगितले. यावेळी गृह विज्ञान तज्ज्ञ रु पाली देशमुख यांनी रानभाज्यांचे आहारदृष्टया महत्त्व, प्रक्रि या आणि त्यापासून बनवण्यात येणाºया विविध पदार्थांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. शास्त्रज्ञ अशोक भोईर यांनी रानभाज्यांचे जतन व त्यांचे दर्जेदार उत्पादन कसे घ्यावे याविषयी मार्गदर्शन केले.
तृणधान्य वर्गातील रानभाज्यांमध्ये क्लोरोफिल नावाचे घटकद्रव्य असते. ते पचनसंस्थेसह रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. वाकळ, रानकेळी, शेवगा, हातगा, भारंगी, शेवळ यांचे गुणधर्म सांगितले. भारंगी, बिंडा, पातेरे सारख्या भाज्यांची चव तुरट व कडू असली तरी त्यात पौष्टिक गुणधर्म अधिक असतात, अशी उपयुक्त माहिती वेबिनारमध्ये दिली. मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विभागाचे संचालक तथा ग्रामीण विकास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. दिलीप पाटील, संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमनाथ विभुते यांनी वेबिनार या उपक्र माला शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. पाचशेहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला होता.
कुपोषण निर्मूलनासाठीही रानभाज्या उपयुक्त
चेन्नई येथील एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशनचे कार्यकारी संचालक डॉ. हरिहरन यांनी वेबिनारला संबोधित केले. कुपोषण निर्मूलनासाठी रानभाज्यांचा आहारात समावेश करावा, असे आवाहन केले.