घरात घुसलेला बिबट्या जेरबंद
By Admin | Published: October 9, 2016 02:52 AM2016-10-09T02:52:25+5:302016-10-09T02:52:25+5:30
गेल्या महिन्यात पूर्ण वाढ झालेला बिबट्या वन विभागाने पकडला असताना शनिवारी सकाळी आच्छाड खंडिपाडा येथे एका आदिवासी शेतकऱ्याच्या घरात बिबट्याचा बछडा शिरला
- सुरेश काटे, तलासरी
गेल्या महिन्यात पूर्ण वाढ झालेला बिबट्या वन विभागाने पकडला असताना शनिवारी सकाळी आच्छाड खंडिपाडा येथे एका आदिवासी शेतकऱ्याच्या घरात बिबट्याचा बछडा शिरला आणि एकच थरकाप उडाला. त्याच्या आवाजाने घरातील मंडळी अक्षरश: जीव घेऊन पळाली. अखेर डहाणू येथील वन्य जीव संरक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांनी जाळी लाऊन त्यास जेरबंद केले.
शनिवारी पहाटे तालुक्यातील आच्छाड खंडिपाडा येथील आदिवासी शेतकरी सोन्या ठाकरे याच्या घरात जवळपास एक ते दीड महिन्याचा बिबट्याचा बछडा शिरला व त्याने कोंबडी फस्त केली. कोंबड्याच्या खुराड्यात झटापटीचा आवाज झाल्याने घरातील महिेलेने पाहिले असता बिबट्या शिरल्याचे तिने पाहिले. त्याही परिस्थितीत ती आतल्या खोलीत जाऊन दरवाजा बंद केला. पहाटेच्या सुमारास आरडाओरड करताच गावकरी जमा झाले त्यामुळे घाबरलेला बिबट्याचा बछडा कुडाच्या घरातच लपुन राहील. एव्हाना बघ्यांची गर्दी झाली असली तरी सर्व गावकरी सुरक्षित अंतारावर होते.
बिबट्याची माहिती मिळताच बोर्डी वन विभागाचे कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले त्याला पकडण्यासाठी डहाणू येथील वन्य जीव संरक्षक संस्थेचे कार्यकर्ते धवल कंसारा, एरिक ताडवाला, पूर्वेस तांडेल, सागर पटेल, रेमंड, प्रतीक, तुषार, राहुल इत्यादी सह वन कर्मचारी मनीष जाधव , सोनवणे यांनी बछड्याला कोणतीही इजा न होता जाळी लाऊन पकडले.
- अजून काही बिबट्यांचा वावर या भागात असल्याने जंगलात कोणी जाऊ नये असे वन विभागा तर्फे सांगण्यात आले आहे. वन जमिनीवर होत असलेले मोठ्या प्रमाणावर अतिक्र मण वनांचा ऱ्हास, वन हक्क साठी होत असलेली जंगल तोड या सर्व कारणाने भक्ष मिळविण्या साठी वन्य जीवाचे मानवी वस्तीत वावर वाढत आहे. वन कायदाच वन्य प्राण्याच्या जीवावर उठला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.