पोलीस ठाण्यातील कामकाजाचे विद्यार्थ्यांना धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 11:03 PM2019-08-05T23:03:38+5:302019-08-05T23:03:47+5:30
जिल्हा स्थापनेची ५ वर्षे; ५०० विद्यार्थ्यांनी तालुक्यातील सातही पोलीस ठाण्यांतील प्रक्रियेची घेतली माहिती
वसई : १ ऑगस्ट २०१९ रोजी पालघर जिल्हा स्थापनेला ५ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने वसई तालुक्यातील सातही पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांना विविध पोलीस ठाण्यातील प्रशासकीय कामकाजाची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी वसई - विरारमधील एकूण पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी येथील विविध पोलीस ठाण्यांना भेट दिली.
विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यातील प्रत्यक्ष आणि दैनंदिन कामकाजाची माहिती व्हावी, यासाठी पालघर पोलीस दलातर्फे विद्यार्थ्यांसाठी तालुक्यातील सातही पोलीस ठाण्यात माहिती सत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पोलीस जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली.
यावेळी विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यातील विविध विभाग, वायरलेस यंत्रणा, सीसीटीएनएस यंत्रणा, पोलीस कोठडी, पासपोर्ट व्हेरिफिकेशन आदी विभागात भेट दिली असता संबंधित अधिकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांना या कामकाजाची माहिती दिली. पोलीस ठाण्यातील विविध शस्त्रांचे प्रदर्शनही यावेळी ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांसोबत मोकळा संवाद साधत त्यांना पोलिसांचे कामकाज सांगण्यात आले. याप्रसंगी त्यांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले. न्यू इंग्लिश स्कूल, आयजीजे, दयानंद स्कूल, होली क्रॉस स्कूल, सोपारा स्कूल, अण्णासाहेब वर्तक स्कूल, डॉ.डी.जे.गाळवणकर, सेंट जॉन्स स्कूल येथील विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यांना भेट दिली.
उपस्थित शाळा आणि विद्यार्थी
यामध्ये वसई पोलीस ठाण्यात - वसई - १००, माणिकपूर - ४५, वालीव - ६७, तुळींज - ३०, नालासोपारा - ५०, विरार - १०० आणि अर्नाळा - ५५ अशा सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यातील कामकाज पाहिले.
पालघर जिल्ह्याला १ आॅगस्ट रोजी ५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या संकल्पनेतून वसई अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सातही पोलीस ठाण्यात अतिशय उत्साहात पार पडला.