'हिंदू धर्मासारखा उदार धर्म जगात दुसरा नाही'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 11:57 PM2019-12-30T23:57:17+5:302019-12-30T23:57:21+5:30
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे गौरवोद्गार; आपला देश सकल धर्माचे माहेरघर
पालघर : हिंदू धर्मासारखा उदार धर्म जगात दुसरा कुठेही नसेल, अशी त्याची महती असल्याचे सांगून सर्वांना सामावून घेण्याची शक्ती या धर्मात असल्याने आपला देश सकल धर्माचे माहेरघर आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांनी माहीम येथे काढले.
माहीम शिक्षण संस्था व भुवनेश कीर्तने महाविद्यालयाच्या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त रविवारी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुख्य अतिथी म्हणून दिब्रिटो बोलत होते. या वेळी माजी राज्यपाल राम नाईक, ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी, खा. राजेंद्र गावित, आ. चिंतामण वणगा, जयवंत सावे, जगन्नाथ राऊत, संस्था अध्यक्ष अनंत पाटील आदी उपस्थित होते.
वसई ही सर्व धर्म मैत्रीची एक प्रयोगशाळा असून समाजाला एकत्र करून पुढे नेण्यासाठी त्यांची प्रगती करण्यासाठी धर्माची उभारणी करण्यात आल्याचे सांगून विशेषत: भारतीय धर्म त्यात असल्याचे सांगितले. आपला देश सकल धर्माचे माहेरघर असल्याने सर्वांना सन्मानाने जगता येते. संस्कृतीप्रमाणे वागता येते. सर्व धर्माला समान हक्क हे घटनेने मान्य केले असून हे जगापुढे आदर्श असल्याचेही ज्येष्ठ साहित्यिक दिब्रिटो यांनी सांगितले, तर शिक्षणाने संस्कारित होणे महत्त्वाचे असल्याचे सांगून पालकांचा आपल्या पाल्यांना इंग्रजी शिक्षण देण्याकडे कल दिसून येत आहे. मात्र प्रत्येक शाळेत मातृभाषेतून शिक्षण देण्याची व्यवस्था निर्माण झाली पाहिजे, असे राम नाईक यांनी सांगितले.
रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर
एका थोर विचारसरणीतून भुवनेश कीर्तने महाराजांनी शाळेची स्थापना केली. एका छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होत आज शाळेत १ हजार ८०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, असे राम नाईक यांनी सांगितले.