इराणी दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 12:06 AM2019-12-23T00:06:16+5:302019-12-23T00:06:29+5:30
पालघर सत्र न्यायालयाचा निकाल
डहाणू/बोर्डी : तालुक्यातील बावडा येथील चिकूवाडीत राहणाऱ्या इराणी दांपत्याच्या घरी दरोडा घालून त्यांचा खून करणाºया आरोपी मोहमद रफीक आदम शेख ऊर्फ रवी रामखिलावनसिंग ठाकूर यास पालघर सत्र न्यायालयाने तिहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर अन्य आरोपी भगवानलाल मोहनलाल कुमावत (रा. सुरत) याला पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले.
९ डिसेंबर २०१४ रोजी आरोपींनी बावडा येथील अर्देसर इराणी (७६) आणि नर्गिस नौशीर इराणी (७४) यांच्या चिकूवाडीतील बंगल्यात दरोडा घातला होता. त्या वेळी या दाम्पत्याने विरोध केल्याने नर्गिस यांचा धारदार कटरने गळा चिरला, तर अर्देसर यांच्या डोक्यावर काठी व कटरने वार करून ठार त्यांना ठार केले होते. त्यानंतर कपाटातील रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने आणि मोबाईल चोरून पळ काढला होता. या दांपत्याकडे घरकाम करणाºया सुरेखा सुरेश पारधी यांनी वाणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तपासी अंमलदार ए.पी.आय. अरुण फेगडे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकांत साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून आरोपी मोहम्मद रफीक आदम शेख ऊर्फ रवी रामखिलावनसिंग ठाकूर, भगवानलाल मोहनलाल कुमावत यांच्यावर गुन्हा नोंदवून अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या वेळी न्यायालयात फिर्यादी पक्षातर्फे २७ साक्षीदारांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या.
फाशीच्या शिक्षेची मागणी
सहाय्यक सरकारी अभियोक्ता डी. आर. तरे यांनी युक्तिवाद करताना आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. मात्र न्यायाधीश एस. एस. गुल्हाणे यांनी आरोपी मोहम्मद रफीक आदम शेख यास दोषी ठरवून तिहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर अन्य आरोपी भगवानलाल कुमावत याची निर्दोष मुक्तता केली.