वसई-विरारला खड्डेमय रस्त्यांतून नागरिकांचा जीवघेणा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 03:49 AM2020-09-19T03:49:10+5:302020-09-19T03:49:37+5:30
मागील काही वर्षांत वसई-विरार शहराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. त्या तुलनेत महापालिका मात्र सोयी-सुविधा पुरवताना दिसत नाही.
विरार : वसई-विरारमधील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले असून त्यातून नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. याबाबत विरार शिवसेनेच्या वतीने वसई-विरार महापालिकेला अनेकदा निवेदने देण्यात आली आहेत, मात्र पालिकेने अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे येत्या आठ दिवसांत वसई-विरार महापालिकेने या रस्त्यावरील खड्डे न भरल्यास तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.
मागील काही वर्षांत वसई-विरार शहराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. त्या तुलनेत महापालिका मात्र सोयी-सुविधा पुरवताना दिसत नाही. विरार स्थानक ते मनवेलपाडा या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने या रस्त्यावरून वाहने चालवताना व चालताना नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मागील काही वर्षांत मनवेलपाडा परिसरात मोठ्या प्रमाणात वस्ती वाढली आहे, मात्र आजही येथील नागरिक खड्ड्यांतून मार्गक्रमण करत आहेत.
या पावसाळ्यातही विरार स्थानक ते मनवेलपाडा या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालवताना नारिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत विरार शिवसेनेच्या वतीने वसई-विरार महापालिकेला अनेकदा निवेदने देण्यात आली आहेत, मात्र याबाबत पालिकेने अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे येत्या आठ दिवसांत वसई-विरार महापालिकेने या रस्त्यावरील खड्डे न भरल्यास शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप पिंपळे व तालुकाप्रमुख नीलेश तेंडोलकर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उपशहरप्रमुख उदय जाधव व शिवसेना उपविभागप्रमुख प्रवीण आयरे यांनी दिला आहे.
जूचंद्र येथील तरुणांची कौतुकास्पद कामगिरी
विरार : पावसाळ्यात जागोजागी पडलेल्या खड्डेमय रस्त्यांतून वसई-विरारकरांना प्रवास करावा लागत असताना महापालिका प्रशासन खड्डे बुजवण्याच्या कामात हलगर्जी करत असल्याने त्याचा फटका नागरिकांना बसत आहे, मात्र नायगाव पूर्व-जूचंद्र येथील तरुणांनी एकत्र येऊन रस्त्यांत पडलेले खड्डे बूजवून ज्यूचंद्रकरांना दिलासा दिला आहे.मागील काही महिन्यांपासून नायगाव पूर्वेतील मुख्य रस्त्यावर पावसामुळे खड्डे पडले होते.
या खड्ड्यांमुळे येथून प्रवास करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. रात्रीच्या सुमारास या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघातही होत होते; परंतु पालिका या रस्त्याची डागडुजी करत नसल्याने जूचंद्र गावातील तरुणांनीच एकत्र येत फावडे व घमेले घेऊन जूचंद्र रेल्वे फाटक ते कर्मवीर महाविद्यालय या परिसरातील खड्डे बुजविले. नेहमीच नागरिकांच्या सातत्यपूर्ण नवनवीन सामाजिक कार्यासाठी ज्यूचंद्र हे गाव ओळखले जाते.