वसई विरारमध्ये बत्ती गुल
By admin | Published: July 15, 2015 11:45 PM2015-07-15T23:45:15+5:302015-07-15T23:45:15+5:30
वसई-विरार परिसरात वीज वितरण व्यवस्थेचा खेळखंडोबा अद्याप थांबलेला नाही. मंगळवारी या दोन्ही परिसरात सुमारे २२ तास वीजपुरवठा खंडीत झाला होता.
वसई : वसई-विरार परिसरात वीज वितरण व्यवस्थेचा खेळखंडोबा अद्याप थांबलेला नाही. मंगळवारी या दोन्ही परिसरात सुमारे २२ तास वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे नागरीकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले. विरार पश्चिम भागात सकाळी गेलेली वीज सायंकाळी ७ वाजता आली तर पूर्व भागात रात्री १२ वाजता गेलेली वीज सकाळी ७ वाजता आली. वीज खंडीत होण्यामागची कारणे एकाही कार्यालयाकडून कळू शक ले नाहीत.
गेला महिन्या भरा पासून वसई विरार भागात सतत वीजपुरवठा खंडीत होत असल्यामुळे नागरीक कंटाळले आहेत तर दुसरीकडे शासकीय कार्यालये, शाळा, हॉस्पिटल आदींवर परिणाम जाणवू लागला आहे. दोन आठवड्यापुर्वी सतत खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे बोळींज येथे गावकरी रस्त्यावर उतरले होते. त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.
या संदर्भात आमदार हितेंद्र ठाकूर यांनी वसई उपविभागाचे अधिक्षक अभियंता सोनावणे यांच्याशी संपर्क साधून त्वरीत कार्यवाही करा अन्यथ: उद्रेक होण्याची शक्यता आहे असे कळवले होते. त्यानंतरही वीज वितरण व्यवस्थेत सुधारणा झाली नाही. उलट वीज खंडीत होण्याच्या प्रकारामध्ये वाढ होत गेली. नालासोपारा येथे खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नगरसेवकांनी एकत्र येऊन अधिक्षक अभियंता कार्यालयावर हल्लाबोल केला होता. परंतु त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झाली नाही.
सहा दिवस मेट गाव अंधारात
वाडा तालुक्यातील मेट येथे असलेल्या विद्युत राहित्रात बिघाड झाल्याने मेट या गावपाड्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. महावितरणला कळवून सुद्धा वीज न आल्याने गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे ग्रामपंचायतीची पाणी योजना बंद असून महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. पाणी अशुद्ध असल्याने साथीचे आजार होण्याची भीती गावकरी व्यक्त करीत आहेत.