बोईसरच्या ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांसह कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 11:51 PM2020-12-26T23:51:23+5:302020-12-26T23:51:30+5:30
गंभीर बाब म्हणजे या इमारतीचा वरील संपूर्ण भाग ज्या लाकडी तुळई (बीम) वर अवलंबून आहे,
- पंकज राऊत
बोईसर : बोईसर ग्रामीण रुग्णालयाची इमारत अत्यंत जीर्ण झाल्याने ती कधीही कोसळण्याची शक्यता असून ही इमारत वापरण्यास योग्य नसल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम खात्याने दिला आहे. मात्र तरीही या धोकादायक इमारतीमध्ये प्रतिदिन शेकडो रुग्णांवर उपचार केले जात असल्याने आरोग्य सेवेच्या कर्मचाऱ्यांबरोबरच रुग्णांच्या जीवाला धोका कधीही उद्भवू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
रुग्णालयाचा आतील व बाहेरील भाग अक्षरशः लोखंडी चॅनेलच्या (अँगल) आधारावर उभ्या असलेल्या या इमारतीतील रुग्णालयात गोरगरीब आदिवासी आणि तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या कुटुंबांबरोबरच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपचारांसाठी येत असतात. त्यामध्ये साथीच्या आजाराच्या रुग्णांसह साप व कुत्रा चावलेले, बाळंतपण असे सुमारे दोनशे रुग्ण प्रतिदिन येत असतात. या सर्वांच्या जीवाशी खेळ सध्या सुरू असून या जीर्ण झालेल्या इमारतीतील रुग्णालयामध्ये प्रसूती कक्ष, लसीकरण, रक्त तपासणी, अपघात, बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभाग आजही सुरू आहेत. ही संपूर्ण इमारत पावसाळ्यात पूर्णपणे गळत असून इमारतीच्या भल्यामोठ्या छतावर दरवर्षी प्लास्टिक टाकावे लागते.
गंभीर बाब म्हणजे या इमारतीचा वरील संपूर्ण भाग ज्या लाकडी तुळई (बीम) वर अवलंबून आहे, जेथे बाह्यरुग्ण विभाग सुरू आहे. या लाकडी बीमला तडा गेला असून त्याला तात्पुरता आधार दिला गेला आहे. तर पहिला मजला पावसाच्या पाण्याच्या गळतीमुळे कमकुवत झाला आहे. या इमारतीला ७४ वर्षे पूर्ण झाली असून दगडी पायावर उभी असलेली ही इमारत वापरण्यालायक नसल्याचे तसेच येथे कुठल्याही प्रकारचे कामकाज करू नये, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम खात्याने केल्या आहेत.