स्थानिकांच्या तत्परतेने वाचले २५ विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:39 AM2018-01-15T00:39:13+5:302018-01-15T00:39:18+5:30
पारनाका येथे शनिवारी झालेल्या बोट दुर्घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने बचावासाठी धाव घेतली म्हणून २५ विद्यार्थ्यांचे प्राण वाचले. अन्यथा, मृतांची संख्या वाढली असती.
शौकत शेख
डहाणू : पारनाका येथे शनिवारी झालेल्या बोट दुर्घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने बचावासाठी धाव घेतली म्हणून २५ विद्यार्थ्यांचे प्राण वाचले. अन्यथा, मृतांची संख्या वाढली असती. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या जान्हवी सुरती, सोनाली सुरती, संस्कृती मायावंशी यांच्या पार्थीवावर शनिवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. दुर्घटनेस जवाबदार धरून बोट मालक धीरज गणपत अंभिरे यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याात आला असून त्याच्यावर उपचार सुरु असल्याने त्याला अटक करण्यात आलेली नाही. तर चालक पार्थ अंभिरे व खलाशी महेंद्र गणपत अंभीरे या दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
शनिवारी दुपारी साडे अकराच्या सुमारास येथील बाबुभाई पोंदा कनिष्ठ महाविद्यालय सुटल्यानंतर समुद्रात सफरीसाठी गेलेली लाँच उलटून ३५ ते ४० विद्यार्थी बुडाले होते. त्यातले तीन मृत झाले होते. तर ९ जण पोहून किनाºयावर आले होते. तर इतरांना सहाय्यकर्त्यांनी वाचविले होते. वेळीच मदत मिळाल्याने अनेकांचे प्राण वाचले. या दुर्घटनेचे वृत्त कळताच जीवाची पर्वा न करता डहाणू खाडी, डहाणू गाव, नरपड चिखले येथील मच्छीमारांनी केलेल्या मदतकार्यांचे कौतुक केले जात आहे.
या दुर्घटनेत तीन विद्यार्थीनींचा मृत्यू झाल्याने डहाणूवर शोककळा पसरली. त्यामुळे या संपूर्ण किनारपट्टीवर आज संक्रात असली तरी एकही पतंग उडविली गेली नाही. आपतकालीन परिस्थीतीशी मुकाबला करण्याबाबत शासन व प्रशासन किती निष्क्रिय आहे हे पाहून उपस्थितांनी अधिकाºयांना धारेवर धरले. देशभरातून विशेषत: महाराष्ट्र आणि गुजरात येथून हजारो पर्यटक येतात. मात्र या ठिकाणी त्यांच्यासाठी कोणत्याच सुविधा नाहीत. जीवरक्षक नसल्याने एखादा प्रसंग घडला तर त्वरीत कोणतीच मदत मिळत नाही.
सागरी सुरक्षेसाठी असलेल्या स्पीडबोटी अनेक महिन्यांपासून नादुरुस्त असल्याने बंद आहेत. त्यामुळे त्याचा काहीच फायदा झाली नाही. तर घटना घडताचा स्थानिक मच्छीमारांनी मदत कार्यासाठी १५ ते २० बोटी समुद्रात नेल्या, ५०० मच्छीमार मदत कार्यात जुंपले गेले होते.
नंदकुमार विंदे, गणेश मर्दे, जयकिसन तामोरे, स्वप्निल विंदे, चंदन मेहेर, धनेश आकरे, गणेश पागधरे, सुधीर खाकरे संजय वेडगा, विनोद वेडगा, सत्तार, मनिष सालकर, शापूर सालकर, विजय दुबळा, सलिम शेख या तरुणांनी जीवाची बाजी लावून बुडालेल्या विद्यार्थ्यांना वाचविले. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. इतरही शेकडो मच्छीमारांनी समुद्रात जाऊन लहान मचव्यामध्ये बसवून विद्यार्थ्यांना किनाºयावर पोहचवले. त्यानंतर समुद्रात जाळी टाकून शोधमोहिम सुरु केली. त्यानंतर बोटीखाली सापडलेल्या दोन मुलींना बाहेर काढण्यात त्यांना यश आले. सुखरुप काढलेल्या डहाणूच्या सर्व विद्यार्थ्यांना डहाणू उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.या बोटींमध्ये नेमके किती विद्यार्थी होते याची नेमकी आकडेवारी नसल्याने सुमारे सहा तास मदतकार्य सुरु होते. संध्या ५ वाजता संस्कृती मायावंशी या विद्यार्थीनीचा मृतदेह बाहेर काढण्यात आल्यानंतर शोधमोहीम थांबविण्यात आली. विशेष म्हणजे डहाणूच्या मच्छीमार बांधवांनी वेळीच मदतकार्य सुरु केले नसते तर कदाचित मृतांचा आकडा वाढला तटरक्षक दलाच्या हॅलीकॉप्टरनेही ६ तास शोधमोहीम राबविली.
यापूर्वी ठाणे जिल्हा असतांना जिल्हा प्रशासनाला डहाणूला यायला जेवढा वेळ लागायचा तेवढाच वेळ याप्रसंगी वरिष्ठांना डहाणूला पालघरहून यायला लागला. त्याबाबत सर्वत्र टीका होत आहे. दुर्घटना घडली असतांना कोस्ट गार्ड कडे स्पीड बोटी उपलब्ध नव्हत्या त्यामुळे कोळी बांधवानी बचाव कार्य सुरू केले.
बचावासाठी धावले विद्यार्थीच कोस्टगार्डच्या बोटी होत्या बंद, मेरीटाइमची बोट मागविली
सर्व प्रथम पोंदा कॉलेज मधील विद्यार्थी पवन गणेश धानमेहेर, . साईराज पागधरे, जतीन मंगेला रा डहाणू मंगेलवाडा, आणि भाविक दवणे रा. धाकटी डहाणू यांनी सर्व प्रथम किनाºयावरुन दोन नॉटिकल अंतरापर्यंत बोटीने जाऊन बचाव कार्य केले. तद्नंतर डहाणू व धाकटी डहाणू, आगर येथील कोळी बांधवानी बचाव कार्य केले त्यामुळे ३२ मुलांचे प्राण वाचले. कोस्टगार्डच्या दोन्ही बोटी बंद आहेत. त्यामुळे मेरिटाईम बोर्डाची एक बोट मागवण्यात आली. तर स्थानिक १५ मच्छिमारांनी आपल्या बोटी बचावकार्यास जुंपल्या. लाखोच्या स्पीडबोटी घेतल्या पण त्यासाठी लागणारा चालक, देखभालीसाठीचा तंत्रज्ञ आणि त्या चालू ठेवण्यासाठी लागणारे पेट्रोल अथवा डिझेल याच्या खर्चासाठी तरतूद होत नाही. त्यामुळे बोटी फक्त शोभेपुरत्या राहतात. प्रत्येक वेळी हाच खेळ होतो, असे अंतस्थ सूत्रांनी सांगितले.