वसई-विरारमध्ये कंटेनमेंट झोनमध्येच लॉकडाऊन, महापालिका आयुक्तांचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 11:48 PM2020-07-12T23:48:25+5:302020-07-12T23:49:32+5:30
आयुक्तांनी कोरोनाच्या सद्य:स्थितीबाबत माहिती देऊन वसई-विरारमध्ये संपूर्ण लॉकडाऊन करावे किंवा शहरात ज्याठिकाणी कोरोना रूग्णांची संख्या जास्त आहे, अशा ठिकाणी मोठे कंटेनमेंट झोन करून ते क्षेत्र प्रतिबंधित करावे, याविषयी उपस्थितांना मते मांडण्याचे आवाहन केले.
पारोळ : वसई विरार-महापालिका परिसरात संपूर्ण लॉकडाऊन करण्याऐवजी केवळ ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढतोय, त्या भागातच लॉकडाऊन करण्याचा निर्णय शनिवारी सायंकाळी महापालिका आयुक्त गंगाथरन डी. यांच्यासोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. संपूर्ण लॉकडाऊनला झालेला सर्वपक्षीय विरोध पाहता, हा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीला माजी महापौर प्रवीण शेट्टी, शिवसेनेच्या किरण चेंदवणकर, बहुजन विकास आघाडीचे महेश पाटील, भाजपचे हरेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजाराम मुळीक, काँग्रेसचे ओनील आल्मेडा, पोलीस अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. आयुक्तांनी कोरोनाच्या सद्य:स्थितीबाबत माहिती देऊन वसई-विरारमध्ये संपूर्ण लॉकडाऊन करावे किंवा शहरात ज्याठिकाणी कोरोना रूग्णांची संख्या जास्त आहे, अशा ठिकाणी मोठे कंटेनमेंट झोन करून ते क्षेत्र प्रतिबंधित करावे, याविषयी उपस्थितांना मते मांडण्याचे आवाहन केले. त्यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी शहरात संपूर्ण लॉकडाऊन न करता कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या ठिकाणी कंटेनमेंट झोन तयार करून तो परिसर पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने प्रतिबंधित करावा, असे मत मांडले. त्यानुसार, सर्व नागरिकांना प्रतिबंधित क्षेत्रात जाणे टाळावे, सार्वजनिक ठिकाणी एकेमकांपासून सहा फूट अंतर ठेवून उभे राहावे, हॅण्ड सॅनिटायझर, मास्कचा वापर करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.