Lockdown News: खलाशांपाठोपाठ १५ हजार वीटभट्टी मजुरांची आर्त हाक; गुजरात सीमेवर अडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 06:13 AM2020-05-07T06:13:17+5:302020-05-07T06:13:26+5:30
डहाणू-तलासरीतील कामगारांचे साकडे
शौकत शेख
डहाणू : ‘कोरोना’मुळे लॉकडाउन जाहीर झाल्याने गुजरातमध्ये अडकलेल्या जवळपास १० हजारांहून जास्त खलाशांची सुटका झाल्यानंतर आता वीटभट्टी मजुरांचाही प्रश्न निर्माण झाला आहे. डहाणू आणि तलासरी तालुक्यातून गुजरात राज्यात वीटभट्टीवर स्थलांतरित झालेले जवळपास १५ हजार वीटभट्टी मजूर गुजरातच्या सीमेवर अडकले असून आपल्या गावाकडे परतण्याची त्यांना ओढ लागली आहे.
लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे दीड महिन्यापासून हे मजूर गुजरात सीमेवर ठिकठिकाणी अडकले असून उपासमारीचा सामना करीत आहेत. त्यांना आपल्या गावाकडे येण्याची ओढ असून हातावर पोट असणारे हे मजूर कच्च्याबच्च्यांसह सरकारकडे आर्त विनवण्या करीत आहेत.
डहाणू आणि तलासरी तालुक्यातील कैनाड, गंजाड, कोसबाड, झाई, अस्वाली, बोर्डी, वधना, कासा, चारोटी, दापचरी, गांगणगाव, वेवजी, वाकी, तलासरी अशा अनेक गावांतील हजारो मजूर भातकापणीनंतर आॅक्टोबरमध्ये कुटुंबासह गुजरात राज्यातील संजाण, भिलाड, खतलवाडा, करंबेली, वापी, बलसाड, वासदा, नवसारी, सुरत, चिखली अशा ठिकाणी आठ महिन्यांसाठी वीटभट्टीच्या कामावर स्थलांतरित होतात. त्यामुळे या कालावधीत जंगलपट्टी भागातील गावेच्या गावे ओस पडतात. याची कोणत्याही ग्रामपंचायतीकडे नोंद नसते. हे स्थलांतरित मजूर मे महिन्यात गावाकडे परतत असतात.
कोरोनामुळे यंदा तेथील वीटभट्ट्या बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे हे मजूर तेथे अडकून पडले. त्यातच हातातील पैसेही संपले असल्यामुळे या मजुरांना उपासमारही सहन करावी लागत आहे. संजाण, भिलाड येथील मजूर चालत गावी आले, तर गुजरात राज्यातील सीमा तेथील सरकार ओलांडू देत नसल्यामुळे काही मजूर तेथेच सीमेवर अडकले आहेत. याबाबत कैनाड ग्रा.पं. सरपंचांनी सहायक जिल्हाधिकारी डॉ. सौरभ कटियार यांना पत्र पाठवून त्यांना आणण्याची मागणी केली आहे.
८० खलाशांसह आणखी एक बोट समुद्रात : गुजरात राज्यातील बंदरांत खलाशी म्हणून गेलेल्या आणि लॉकडाउनमुळे अडकून पडलेल्या १२ हजार खलाशांना डहाणू बंदरात यापूर्वीच उतरविण्यात आले असून त्यांच्यात्यांच्या घरी पाठवण्यात आले आहे. मात्र, आणखी एक बोट ८० खलाशांना घेऊन मंगळवारी डहाणू बंदरात दाखल झालेली आहे. या बोटीतील खलाशीही डहाणू बंदरात उतरविण्याच्या प्रतीक्षेत आहे.