Lockdown News: वाड्यातील महिला शेतकऱ्याने स्वत:च स्टॉल लावून केली कलिंगडांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 01:34 AM2020-05-08T01:34:33+5:302020-05-08T01:35:08+5:30
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कमावला नफा
वाडा : अवकाळी पाऊस, पिकावरील रोगाचा प्रादुर्भाव यासारखी नैसर्गिक आपत्ती कायमच पाचवीला पुजलेली. त्यातच बियाण्यातील भेसळीसारख्या कृत्रिम समस्येमुळे वाडा तालुक्यातील भात उत्पादन शेतकरी पुरता त्रस्त झाला आहे. त्यामुळे भातपिकाला पूरक व्यवसाय म्हणून तालुक्यातील देवळी या गावातील महिला शेतकऱ्यांनी हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात कलिंगड शेती केली आहे. कलिंगड शेती बहरून येऊन उत्पादनही भरघोस आले आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशभरात लागू केलेल्या संचारबंदीमुळे बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्याने स्वत:च स्टॉल लावून कलिंगडांची किरकोळ विक्र ी केल्याने ही शेती नफ्यात आली आहे.
तालुक्यातील महिला शेतकरी शालिनीताई पाटील या दरवर्षी आपल्या शेतीत नवीन तंत्रज्ञान वापरून वेगवेगळ्या प्रकारची पिके घेत असतात. या वर्षी त्यांनी तूर, मूग, हरभरा, वाल या कडधान्य पिकाबरोबरच पपई आणि मल्चिंग पद्धतीने कलिंगड शेती केली आहे. मात्र कलिंगड तयार झाले आणि कोरोनाचे संकट आल्याने कलिंगडचा भाव गडगडला. त्यामुळे व्यापारी मातीमोल किमतीत मागू लागल्याने पाटील यांनी या परिस्थितीवर मात करत आपण पिकवलेला माल पडक्या भावाने व्यापाऱ्यांना देण्यापेक्षा स्वत: स्टॉल लावून विक्र ी करण्याचे धाडस करून हे उत्पादित केलेले संपूर्ण कलिंगड विकून त्यांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे.
शालिनीताई पाटील या महिला शेतकºयांनी आपल्या शेतात अडीच एकर जागेत स्विटहार्ड कृषी सेवा केंद्र वाडा येथून कावेरी सीटस कंपनीची कलिंगडची एक एकर जागेसाठी १६ हजार रु पयांची १४ पाकिटे बियाणांची खरेदी केली होती. एक एकर जागेसाठी ५० ते ६० हजार खर्च झाला होता. त्यातून १६ ते १७ टन माल निघाला होता. एक कलिंगड ५ किलोपर्यंत गेले होते. काही कलिंगडे अडीच ते तीन किलो वजनाची होती. लॉकडाउनमुळे वाडा-मनोर महामार्गावर केळीचा पाडा येथे स्वत:च स्टॉल लावून कलिंगड विक्र ी केल्याने एका किलोला १५ ते २० रूपये भाव आल्याने यातून अडीच लाख रुपये उत्पन्न मिळाल्याची माहिती पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.
उद्भवलेल्या परिस्थितीचा फायदा व्यापारी घेऊन शेतकºयांची पिळवणूक करून मातीमोल भावाने शेतकºयांचा माल खरेदी करतात. त्यामुळे व्यापाºयांवर अवलंबून न राहता आपण पिकवलेला माल स्वत:च विक्री केला तर त्यातून फायदा हा निश्चितच होऊन मनाला एक वेगळे समाधान मिळते. - शालिनीताई पाटील, वाडा