ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 06:30 AM2024-05-03T06:30:06+5:302024-05-03T06:33:15+5:30
पालघर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आदित्य ठाकरे पालघरमध्ये आले होते.
पालघर : भाजपला उमेदवारही सापडत नसल्याने ते ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयमधून उमेदवार शोधत असावेत, असा टोला शिवसेना युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी लगावला.
पालघर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आदित्य ठाकरे पालघरमध्ये आले होते. यावेळी महाविकास आघाडीकडून मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात येऊन चार रस्ता ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. यावेळी महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे आमदार विनोद निकोले, आदिवासी एकता परिषद भूमिसेनेचे अध्यक्ष काळूराम धोदडे, काँग्रेसच्या संगीता धोंडे, ब्रायन लोबो आदी उपस्थित होते. बहुजन विकास आघाडीला विचारा की ते नक्की कुठल्या बाजूने आहेत? जिथे सरकार, सत्ता तिथेच ते सरकत असतात.
आम्ही कोणत्याही ठेकेदारासोबत नाही. जेथे स्थानिक जनता तेथे आम्ही आहोत. नाणार, बारसू आणि वाढवणबाबत आमची स्पष्ट भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले.