आपटी गावात साजरा होतो उत्सवाचा ‘लोकमान्य’ आदर्श; एक गाव एक गणपती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 02:14 AM2020-08-24T02:14:34+5:302020-08-24T02:14:46+5:30
गेली ४६ वर्षे ही संकल्पना अव्याहत सुरू असून गावातील सर्व गावकरी एकत्रित येऊन हा गणेशोत्सव साजरा करतात.
राहुल वाडेकर
विक्रमगड : घरगुती पातळीवरील गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात सुरू करण्याच्या लोकमान्य टिळकांच्या संकल्पनेमागे समाज एकजुटीकरणाची भावना होती. हीच भावना जपत विक्रमगड शहरानजीकचे एक गाव गेल्या ४६ वर्षापासून ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना यशस्वीरीत्या राबवीत आहे. संपूर्ण गावात एकाच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून आपटी बु. गावाने ऐक्याचा संदेश दिला आहे. दरम्यान, तालुक्यातील झडपोली, गावितपाडा, सवादे, खुडेद आदी अनेक ठिकाणीही ‘एक गाव एक गणपती’ची संकल्पना राबविली जात आहे.
कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता गणेशोत्सवापूर्वी विक्रमगड पोलीस कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या गाव-पाड्यांतील व्यापारी, पोलीस पाटील, नागरिक, राजकीय पक्षाचे पुढारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी तालुक्यातील खेड्यापाड्यांत ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबविण्याचे व गावामध्ये गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग राखण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार तालुक्यात अनेक भागात ही संकल्पना राबविली जात असून या वर्षी ‘एक गाव एक गणपती’ संकल्पनेमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे.
विक्रमगड मुख्य बाजारपेठ (शहरापासून) ८ कि.मी. अंतरावर हे आपटी बु.गाव आहे. गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना गावकरी सार्वजनिक नवतरुण मित्र मंडळाच्या माध्यमातून तब्बल ४६ वर्षे निष्ठापूर्वक भक्तिभावाने व एकोप्याने राबवीत आहेत. गणेशोत्सव चालू करण्यामागचा लोकमान्यांचा उद्देश गावकऱ्यांनी सफल करून दाखविला आहे. त्याअनुषंगाने इतर गावांनीही ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली असून दरवर्षी यामध्ये वाढ होताना दिसत आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे.
१९७० साली नवतरुण, शिक्षक व प्रतिष्ठित नागरिक यांनी गावात एकाच गणेशमूर्तीची स्थापना केली. त्यास ४६ वर्षांचा काळ लोटला असून आजही ही संकल्पना राबविली जात आहे. यातून आपली एकजूट कायम राहील असा विचार मांडला, असे नवतरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्याला सरपंच, पोलीस पाटील यांनीही दुजोरा देत ही संकल्पना उचलून धरली. या अनुषंगाने सरपंच, पोलीस पाटील, गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी आपटी बु. ग्रामस्थांचे सार्वजनिक असे नवतरुण मित्र मंडळ स्थापन करून ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली.
गेली ४६ वर्षे ही संकल्पना अव्याहत सुरू असून गावातील सर्व गावकरी एकत्रित येऊन हा गणेशोत्सव साजरा करतात. मात्र यंदा या एकजुटीच्या उत्सवावर कोरोना संसर्गामुळे विरजण पडले. या गावाची लोकसंख्या एक हजार पाचशे आसपास आहे. गावाने एक गाव एक गणपती संकल्पना राबवून सामाजिक एकात्मेचा आदर्श उभा केला आहे. त्याचप्रमाणे या आदर्शचा दुसरा भाग म्हणजे तालुक्यातील झडपोली, गावितपाडा, सवादे, खुडेद आदी अनेक ठिकाणीही एक गाव एक गणपतीची संकल्पना राबविली जात आहे.