लोकमत इफेक्ट: चिंचणीत पाणीपुरवठा सुरू; आठ दिवसांपासून पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 11:24 PM2020-03-13T23:24:56+5:302020-03-13T23:25:11+5:30
परिसरातील महिलांची वणवण
डहाणू : डहाणूच्या बंदरपट्टी भागातील सर्वात मोठ्या चिंचणी गावात गेल्या आठ-नऊ दिवसापासून पिण्याचे पाणी येत नसल्याने पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत होते. विशेष म्हणजे चिंचणी गावात पिण्याचे पाण्याची विहिरीची संख्या कमी असल्याने महिलांना बोअरिंगचे गढूळ पाणी भरावे लागत होते. मात्र आज याबाबतीत लोकमतने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्याने पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे होऊन पाणीपुरवठा सुरू केल्याने ग्रामस्थाने सुटकेचा निश्वास सोडला. डहाणू तालुक्यातील सर्वात मोठ्या चिंचणी ग्रामपंचायत हद्दीतील नळ कनेक्शनधारक ग्रामस्थांवर एक कोटीची थकबाकी झाली होती. वारंवार सूचना नोटिसा देऊनही ही बहुसंख्य ग्रामस्थ बिले भरत नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाचा कारभार ठप्प झाला होता. शिवाय ग्रामपंचायतीने पंचायत समितीला दिलेल्या चेकही बाऊन्स झाल्याने पंचायत समिती दहा नमुने चिंचणी गावात पाणीपुरवठा कपात करण्याच्या निर्णय घेतल्याने गेल्या आठ-दहा दिवस पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली होती. याबाबतीत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच बहुसंख्य ग्रामस्थांनी पंचायत समिती प्रशासनाला जाब विचारला, तर चिंचणी ग्रामपंचायत प्रशासनाची देखील धावपळ उडाली होती. त्यामुळे आजअखेर ग्रामपंचायतीने तसेच पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने तत्काळ चिंचणी गावाला पाणीपुरवठा सुरू केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करून ‘लोकमत’चे आभार मानले. शुक्रवारी ग्रामपंचायत चिंचणीने गावात पाणीपुरवठा सुरू केला असला तरी प्रशासनाने थकबाकीदारांकडून थकबाकी वसुली करण्याची मोहीम सुरू केली असून पाण्याचे बिल न भरणाऱ्या लोकांच्या पाणीपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे.
ग्रामस्थांनी मानले आभार
पंचायत समितीने चिंचणी गावाला तत्काळ पाणीपुरवठा सुरू केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करून ‘लोकमत’चे आभार मानले.