जव्हारमध्ये पेट्रोल पंपावर लांबलचक रांग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 01:09 AM2020-06-24T01:09:22+5:302020-06-24T01:09:26+5:30
काही दिवसांपूर्वी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे तक्रार केली होती. आता जिल्हा पुरवठा विभागाने यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
हुसेन मेमन
जव्हार : जव्हार शहरात दोनच पेट्रोल पंप असून त्यातील भारत पेट्रोलियम कंपनीच्या जुन्या पेट्रोल पंपावर ग्राहकांची लांबलचक रांग लागत आहे. तसेच एकच मशीन सुरू ठेवल्यामुळे ग्राहकांना ऊन-पावसात तासन्तास या रांगेत ताटकळत राहावे लागत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे गर्दी टाळण्याच्या सूचना असतानाही पेट्रोल हे दृश्य पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे तक्रार केली होती. आता जिल्हा पुरवठा विभागाने यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
शहरालगत असल्याने या पंपावर नेहमीच गर्दी होते. मात्र, या पंपावर कंपनीकडून बंधनकारक असलेल्या सुविधा पुरवल्या जात नाहीत. एकच मशीनमधून ग्राहकांना पेट्रोल वितरित केले जात असल्यामुळे तालुक्यातील शेकडो ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत कंपनीकडे अनेक तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही, तसेच जिल्हा पुरवठा विभागही मूग गिळून गप्प आहे. त्यामुळे पपंचालकाच्या या कारभाराबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष का, असा सवाल चालक करत आहेत.
याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी संजय आहिरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती घेऊ न सांगतो असे सांगत फोटो आहेत का असे विचारून उत्तर देण्यास टाळाटाळ केली. काही वेळाने पुन्हा विचारणा केली असता पंपावर पेट्रोल संपले आहे. त्याने पंप बंद केला आहे, असे सांगत कारवाईबाबत काहीच न सांगता फोन कट केला व पुन्हा उचललाही नाही.
>एकाच मशीनचा वापर का?
पंपावर चार मशीन असताना काही वर्षांपासून एकाच मशीनद्वारे इंधन वितरण केले जात आहे, त्यामुळे या मशीनमध्ये काही काळेबेरे तर केलेले नाही ना ? असा प्रश्न ग्राहकांकडून उपस्थित होत आहे. याबाबत पुरवठा विभागाकडून या पंपाची चौकशी करावी व सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी केली जात आहे.