भिवंडीतील पडघा टोलनाक्यावर वाहनांच्या लांबचलांब रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 11:34 PM2021-02-21T23:34:36+5:302021-02-21T23:34:47+5:30
नितिन पंडित भिवंडी : टोलनाक्यांचे माहेरघर म्हणून भिवंडीची नवी ओळख निर्माण झाली आहे. मुंबई ठाण्यापासून जवळ असलेल्या भिवंडीत ठाणे ...
नितिन पंडित
भिवंडी : टोलनाक्यांचे माहेरघर म्हणून भिवंडीची नवी ओळख निर्माण झाली आहे. मुंबई ठाण्यापासून जवळ असलेल्या भिवंडीत ठाणे, वाडा , वसई, नाशिक , कल्याण कुठूनही यायचे झाले तरी टोल भरावा लागतोच, अशी परिस्थिती भिवंडीत आहे. आता केंद्र सरकारने वाहनांना फास्टॅग लावणे अनिवार्य केल्याने येथील स्थानिक वाहन चालकांसह प्रवासी वाहन चालकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र या फास्टॅगमुळे टोल कर्मचारी व वाहनचालक यांच्यात मोठ्या प्रमाणात वाद होत असून टोलनाक्यांवर फास्टॅग मुळे वाहनांच्या लांबचलांब रांगा लागत आहेत.
पडघा टोलनाक्यावर फास्टॅगमुळे वाहनांच्या रांगा लागत असल्याने वाहन चालक हैराण होत आहेत. मात्र टोल कंपनी केंद्र शासनाचे निर्देश पुढे करून नागरिकांकडून टोल वसूली करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहे. मुंबई नाशिक महामार्गावर असलेल्या पडघा टोलनाक्यावर शनिवार व रविवारी सुट्टी असल्याने शिर्डी, नाशिककडे जाणाऱ्या व तेथून मुंबईकडे येणाऱ्या वाहनांची गर्दी जास्त असते. इतर दिवसांपेक्षा शनिवार व रविवार या दोन दिवसांत या टोलनाक्यावर वाहनांची मोठी गर्दी असते; मात्र आजपर्यंत ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पडघा टोलनाक्याकडून ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांना टोलनाक्यावर एक ते दोन तास ताटकळत राहावे लागते.
केंद्र सरकारने वाहनांना फास्टॅग लावण्याचे निर्देश दिल्याने पडघा टोलनाक्यावर सध्या सर्व लाईन फास्टॅगच्या करण्यात आल्या आहेत. मात्र स्थानिक नागरिकांचा टोल भरण्यास विरोध असल्याने टोलनाक्यावर अनेकवेळा वाद होतात. फास्टॅग ऑनलाइन असल्याने स्थानिक वाहन चालकांसाठी सिस्टीम मॅन्युअल करावी लागते. यात ५ ते ६ मिनिटे जातात. त्यामुळे गर्दी वाढते. स्थानिकांना टोलमध्ये सूट मिळावी म्हणून गाडीचे पेपर टोलनाक्याकडे जमा केल्यास फक्त १० टक्केच टोल भरावे लागतो. मात्र १० टक्के टोल भरण्यासदेखील स्थानिकांचा विरोध असल्याने त्यांची समजूत काढण्यात वेळ वाया जातो.
परिणामी टोलनाक्यावर वाहनांची गर्दी वाढते. ज्यांच्या जमिनी रस्त्यासाठी बाधीत झाल्यात अशांसाठी टोल कंपनी सहानुभूती दाखविणार आहे. मात्र कुणीही स्थानिक नागरिक म्हणून सांगतो, त्यांच्याकडे पेपर मागितले की स्थानिक पुराव्याचे पेपर देण्यास वाहन चालक टाळाटाळ करतात. त्यामुळे टोल नाक्यावर भांडणतंटे होतात.
सध्या शासनाने नागरिकांना फास्टॅगसंदर्भात जनजागृतीसाठी एक महिन्याची मुदत दिली आहे. त्यानंतर पोलीस प्रशासनास हाताशी धरून टोलवसुली मोहीम राबविली जाईल. त्यामुळे सर्व नागरिकांनी आपल्या वाहनांना फास्टॅग लावणे गरजेचे आहे. त्यामुळे टोलनाक्यावरील वेळ वाचेल, असे मत पडघा टोलनाक्याचे व्यवस्थापक बाबूभाई शेख यांनी व्यक्त केले आहे. पडघा टोलने वेळेचे नियोजन करून नागरिकांचा वेळ वाचवावा अशी प्रतिक्रिया वाहन चालक तेजस चव्हाण, ॲड. कल्पेश पाटील यांनी दिली आहे. तर फास्टॅग नसल्याने टोलवसुली दुप्पट करणे चुकीचे आहे अशी प्रतिक्रिया संदेश श्रीराम पाटील यांनी दिली आहे.