सूर्या कालव्याची १५ वर्षांपासून दुरुस्ती झाली नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 01:30 AM2021-03-25T01:30:34+5:302021-03-25T01:30:43+5:30
पाण्याची गळती : परिसरातील शेतीला होतो अपुरा पाणीपुरवठा
शशिकांत ठाकूर
कासा : डहाणू तसेच पालघर तालुक्यातील गावांना सूर्या प्रकल्पातून उन्हाळ्यात कालव्याअंतर्गत शेताला पाणीपुरवठा केला जातो. मात्र १५ वर्षांपासून शेताला पाणीपुरवठा करणाऱ्या कालव्यांची दुरुस्ती न झाल्याने कालवे मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त झाले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्याने शेताला अपुरा पाणीपुरवठा होतो. परिणामी, कालव्याच्या पाण्यावर होणाऱ्या शेतीवर परिणाम होणार असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
डहाणू, पालघर आणि विक्रमगड तालुक्यातील १४ हजार ६९६ हेक्टर जमीन सूर्या कालवाअंतर्गत सिंचनाखाली आणण्यात आली आहे. डहाणू तालुक्यातील सूर्यानगर, वाघाडी, सोनाली, खनिव, वेती, वरोती, तवा, पेठ, धामटने, चारोटी, कासा, सारणी, निकावली, ऊर्से, रानशेत, साखरे, गोवणे, दाभोण, तर पालघर तालुक्यातील सोमटा, बऱ्हाणपूर, आंबेदा, नानिवली, चिंचारे, अकेगव्हाण, रावते, शिगाव, कुकडे, महागाव, गारगाव, गुंदले, वाळवे अशा सुमारे ९० ते १०० गावांना उन्हाळ्यात सूर्या कालव्यातून शेतीला पाणीपुरवठा केला जातो.
कालव्यातून पाणीगळती होऊ नये म्हणून जलसंपदा विभागाने सर्व माती भरावाचे असलेले कालवे बाहेरून डबर व दगडांनी पिचिंग केले आहेत. आतील बाजूने बांधकाम तसेच प्लास्टिकचे अस्तरीकरण केले, मात्र नंतर बऱ्याच काळापर्यंत दुरुस्ती न केल्याने अनेक ठिकाणी कालव्यांचे बांधकाम आणि प्लास्टर पाण्यात वाहून गेले आहे.
काही ठिकाणी तर कालव्यांचे प्लास्टर आणि बांधकाम पूर्णपणे निघून गेल्याने आतून कालवे ढासळून गेले असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या कालव्यांतून पाण्याची मोठी गळती होते. कालव्यांना जोडणाऱ्या काही गावांना अपूर्ण पाणीपुरवठा होतो. त्यामुळे तेथील बऱ्याच शेतकऱ्यांनी भातशेती करणे बंद केले आहे, तर गळतीमुळे मुख्य कालव्यातून उपकालव्यांना जोडणाऱ्या शेतालादेखील योग्य पाणीपुरवठा होत नसल्याचे शेतकरी सांगतात. तसेच कालव्यातून दुरुस्तीअभावी पाण्याची गळती होत असल्याने मुख्य कालव्याच्या टोकाकडील गावांना अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने पिकांवर परिणाम होत असल्याचेही शेतकरी सांगतात.
शेतकऱ्यांकडून वेळोवेळी पाणीपट्टी (बिल) भरूनही कालव्याची दुरुस्ती होत नसल्याने शेतीला अपुरा पाणीपुरवठा होतो. - सुनील जाधव, शेतकरी.