पालघर न.प.ला लाखोंचा तोटा, प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना । थकबाकीची रक्कम मिळत नसल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 12:02 AM2020-07-05T00:02:17+5:302020-07-05T00:02:53+5:30
पालघर नगर परिषदेमध्ये राहणाºया नागरिकांना होणारा पाणीपुरवठा पालघर व २६ गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून सूर्यानदीतून केला जातो.
पालघर : पालघर नगर परिषदेकडून चालविण्यात येणाऱ्या २६ गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतील पाणी वापराची लाखो रुपयांची थकबाकी नगर परिषदेला मिळत नसल्याने दरवर्षी नगर परिषदेला लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. बिल आकारणीसाठी पाइपलाइनवर मीटर्स लावण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मान्यता मिळत नसल्याची बाब समोर आली आहे.
पालघर नगर परिषदेमध्ये राहणाºया नागरिकांना होणारा पाणीपुरवठा पालघर व २६ गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून सूर्यानदीतून केला जातो. या योजनेत पालघर नगर परिषद हद्दीतील पालघर, गोठणपूर, वेवूर, घोलवीरा, नवली, लोकमान्य नगर, टेभोडे, अल्याळी अशा आठ गावांचा समावेश होतो. उर्वरित सातपाटी, शिरगाव, धनसार, उमरोळी, पंचाळी, दापोली, मोरेकुरण, खारेकुरण, नंडोरे, वाकोरे, पडघे, बिरवाडी, देवखोप, शेलवाली, अंबाडी, वागुळसार, हरणवाडी या गावांनाही पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. या योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून करण्यात आले असून आॅक्टोबर २०११ रोजी ही योजना पालघर नगर परिषदेकडे वर्ग करण्यात आली होती. तेव्हापासून या नळ पाणीपुरवठा योजनेचा संपूर्ण खर्च पालघर नगर परिषद करीत आली आहे.
सध्या या योजनेतून १२ एमएलडी इतका पाणीपुरवठा होत असून त्यातील ६ एमएलडी पाणी नगर परिषद क्षेत्राला तर अन्य ६ एमएलडी पाणी उर्वरित गावांना वितरित केले जात आहे. या योजनेचे वीज बिल, पाण्याचे शुद्धीकरण, मेन्टेनन्स, वहन, कर्मचारी इत्यादी सर्व खर्च नगर परिषदेकडून केला जात आहे. ही योजना चालविण्यासाठी पालघर नगर परिषदेला अंदाजे ४० लाख ९४ हजार ६०६ रुपये इतका मासिक खर्च येत असून वार्षिक ४ कोटी ९१ लाख ३५ हजार २७२ रुपये इतका खर्च येतो, असे नगर परिषदेचे म्हणणे आहे.
२७ गावे योजनेतील पाणी वापर करणाºया अन्य १९ ग्रामपंचायतींकडून वापरण्यात येणाºया पाण्याची बिले वसूल करण्याची जबाबदारी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाची आहे. मात्र मागील तीन वर्षांपासून पंचायत समितीकडून पाणी वापरापोटी नगर परिषदेला ४० लाख ३ हजार ५३ रुपयांची थकबाकी येणे असल्याचे नगर परिषदेचे म्हणणे आहे. उर्वरित पाणी शुद्धीकरण, पाटबंधारे विभागाकडून पाणी विकत घेण्याची रक्कम, मेंटेनन्स इत्यादी पोटीही लाखो रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. अनेक वेळा मागणी करूनही नगर परिषदेला आपली थकबाकी मिळत नसल्याने नगर परिषदेने खासदार राजेंद्र गावितांना गळ घातली होती. त्या अनुषंगाने पालघरच्या विश्रामगृहात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीत नगराध्यक्ष डॉ. उज्ज्वला काळे, उपनगराध्यक्ष उत्तम घरत, गटनेते भावानंद संखे, कैलास म्हात्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र दुधे, मजिप्राचे अधीक्षक अभियंता अरुण निरभवणे, मुख्याधिकारी अरविंद माळी, पं.स.चे उपअभियंता आर. पाध्ये, एस. बी. शिरसीकर, विनोद पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.
अखेर खा. राजेंद्र गावितांनी घेतली आढावा बैठक
पालघर नगर परिषदेने प्रत्येक गावाच्या पाण्याच्या लाइनवर मीटर बसवून त्याप्रमाणे संबंधित ग्रामपंचायतीकडून बिल आकारावे, असा ठराव घेण्यात आला असून मजिप्राकडे तो तांत्रिक मंजुरीकरिता सादरही करण्यात आला असून त्याला मंजुरी मिळत नसल्याने नगर परिषदेला तोटा सहन करावा लागत असल्याची बाब खासदारांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तत्काळ या प्रस्तावाला मंजुरी देण्याच्या सूचना खासदारांनी दिल्या. या वेळी थकबाकी व पाण्याच्या उचलपोटीची रक्कमही पंचायत समितीने नगर परिषदेकडे भरणा करावी, अशी मागणी करण्यात आली. जिल्हा भविष्यात विस्तारला जाणार असल्याने पाण्याचा नियोजन आराखडा तयार केल्यास जादा पाणी मिळविण्यासाठी मी प्रयत्न करीन, असा शब्दही त्यांनी या वेळी दिला.