कोरोनाकाळातही प्रेमाला बहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 01:02 AM2020-07-27T01:02:21+5:302020-07-27T01:02:27+5:30
समुद्रकिनाऱ्यांवर युगुलांची गर्दी : पोलिसांकडून कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
विरार : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तरुणाईच्या गाठीभेटीवर बंधने आली असली तरी, संयमाची परिसीमा ओलांडून व कोरोनाची भीती झुगारून काही युगुले एकमेकांना भेटण्यासाठी समुद्रकिनारे गाठत असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक प्रेमातुर युगुले नालासोपारा येथील कलंब, राजोडी समुद्रकिनारी एकत्र येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सर्वच पर्यटन स्थळे आणि समुद्र किनाऱ्यांवर जाण्यास बंदी घातली आहे. मात्र सातत्याने वाढत असलेल्या लॉकडाऊनमुळे प्रेमीयुगुलां-सोबतच तरुणांचा संयम तुटत आहे. त्यामुळे प्रेमातुर तरुणाई बंधने आणि नियम झुगारून वसई-विरारमधील समुद्रकिनारे गाठत आहेत.
गेल्या चार महिन्यांच्या लॉकडाऊनने सगळ्यांनाच कंटाळा आणला आहे. त्यात मागील काही दिवसांपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली असून हिरव्यागार निसर्गालाही बहर आलेला आहे. या सगळ्याचा आस्वाद घ्यायचा तर बाहेर पडण्यावाचून पर्याय नाही. नेमका हाच निसर्ग खुणावत असल्याने तरुणाई सर्व नियम-बंधने झुगारून समुद्रकिनारे गाठत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र या प्रेम आणि निसर्गवेड्या तरुणांमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, वसई, नालासोपारा आणि विरारमधील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. यातील काही परिसर ‘हॉटस्पॉट’ म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.