महाजन, ठाकरे सभागृहाच्या कंत्राटदारास वेसण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 10:54 PM2019-12-17T22:54:12+5:302019-12-17T22:54:18+5:30

भाईंदर पालिका : दोन्ही ठिकाणी तक्रार निवारण कक्ष सुरू, सातत्याने नियमांचे उल्लंघन

Mahajan, Thackeray's hall contractor in trouble | महाजन, ठाकरे सभागृहाच्या कंत्राटदारास वेसण

महाजन, ठाकरे सभागृहाच्या कंत्राटदारास वेसण

Next

मीरा रोड : मीरा- भार्इंदर महापालिकेच्या इंद्रलोकमधील प्रमोद महाजन व रामदेव पार्क येथील मीनाताई ठाकरे सभागृह चालवणाऱ्या पालिका कंत्राटदाराकडून नियमांचे उल्लंघन केले जात असल्याने या प्रकरणी आता दोन्ही सभागृहात तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आला आहे. कंत्राटदाराने नागरिकांकडून केवळ हॉलचे भाडे घेणे बंधनकारक असून कॅटरिंग, डेकोरेशन हे नागरिक स्वत:च्या मर्जीप्रमाणे बाहेरुनही आणू शकतात असे स्पष्ट करून कंत्राटदाराने अडवणूक केल्यास त्याची तक्रार करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.


मीरा- भार्इंदर महापालिका आणि सत्ताधारी भाजपने मोठा गाजावाजा करत सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी म्हणून महाजन व ठाकरे हॉल उपलब्ध करुन दिल्याचा दावा केला होता. पालिकेने फर्निचरसह आलिशान महाजन व ठाकरे हॉल गोल्डन पेटल या कंत्राटदारास ५ वर्षाच्या भाडेकराराने चालवण्यास दिले. कराराप्रमाणे कंत्राटदारास लग्न आदी समारंभास कॅटरिंग व डेकोरेशनची सक्ती करता येणार नाही असे स्पष्ट असतानाही कंत्राटदाराकडून मात्र सर्रास नागरिकांची लूट चालवली गेली. कॅटरिंग व डेकोरेशनची सक्ती केली जाऊन मनमानीपणे शुल्क नागरिकांकडून घेतले जाऊ लागले.


भाजपच्या एका नगरसेवकासह काहींचे हितसंबंध गुंतल्याचे आरोप व तक्रारी झाल्यानंतर तसेच ‘लोकमत’ मधून सतत या गैरप्रकारांना वाचा फोडण्यात आल्यानंतर अखेर सुनावणी झाली. सुनावणीनंतरही कंत्राट रद्द करून अनामत रक्कम जप्त करण्यासाठी विलंब लावण्यात आला.


हॉल ताब्यात घेण्याऐवजी वेळकाढूपणा करत कंत्राटदारास न्यायालयात जाऊन स्थगिती मिळवण्याची संधी दिली. त्या नंतरही विधी विभागाकडून या प्रकरणी न्यायालयात ठोस वस्तूस्थिती मांडण्यासाठी प्रभावी प्रयत्नच केले गेले नाहीत असे आरोप नागरीकांमधून सतत होत आहेत. करारनाम्यात लवाद म्हणून आयुक्त काम पाहणार असल्याचे नमूद असतानाही कांगावे चालवले जात आहेत.
ठाकरे मंडईतील गाळे व दुकाने यांचा तर निविदा आणि करारनाम्यात शुल्क आकारणी तसेच भाड्याचा उल्लेखच टाळण्यात येऊन पालिकेचे मोठे नुकसान केले गेले. दुसरीकडे कंत्राटदार मात्र परस्पर दुकाने १ लाख अनामत रक्कम घेऊन महिना दहा हजार आदी भाड्याने करारनामे करून देत आहेत.


महाजन सभागृहाचे भाडे २० हजार व तळ मजल्याचे १० हजार आहे. तर ठाकरे सभागृहाचे भाडे २० हजार व वातानुकूलित नको असेल तर १५ हजार आहे. कंत्राटदाराने भाडे आकारायचे असून त्याला कॅटरिंग, डेकोरेशन आदीची सक्ती करता येणार नाही.


कंत्राटदारास दिली समज
कंत्राटदाराने सक्ती केल्यास वा नियमाप्रमाणे भाडे - शुल्क न घेतल्यास त्याची तक्रार महापालिकेकडे करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. कंत्राटदारास बुकींग झालेल्या तारखा व कुणाच्या नावाने शुल्क आकारुन बुकींग केले आहे त्याची माहिती देण्यास बजावण्यात आले आहे.

Web Title: Mahajan, Thackeray's hall contractor in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.