"भिजलेल्या कोंबडीसारखे बसलेले मुंबईला गेल्यावर..."; तावडेंनी केलेल्या दाव्यावर ठाकुरांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 01:16 PM2024-11-20T13:16:30+5:302024-11-20T13:22:10+5:30
भाजप नेते विनोद तावडे यांनी केलेल्या आरोपांवर हितेंद्र ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Hitendra Thakur On Vinod Tawde : मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैसे वाटल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी बुधवारी पुन्हा एकदा फेटाळून लावला आहे. आपल्याला नियमांची चांगली जाण असून, राजकीय विरोधकांच्या मालकीच्या हॉटेलमध्ये असे प्रकार करण्यासाठी मी मूर्ख नाही, असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या काही तास आधी, बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी मंगळवारी विनोद तावडेंवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी विरारमधील एका हॉटेलमध्ये ५ कोटी रुपये वाटल्याचा आरोप केला.
विरारच्या विवांता हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे आणि राजन नाईक हहे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये गोंधळ घातला होत. यानंतर बविआचे प्रमुख हितेंद्र ठाकूर आणि आणि नालासोपाऱ्याचे आमदार क्षितिज ठाकूर हे दाखल झाले होते. यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना भाजपच्या लोकांनीच मला विनोद तावडे पैसे वाटण्यासाठी येणार असल्याचे सांगितल्याचे म्हटलं. मात्र आता विनोद तावडे यांनी हे आरोप फेटाळून लावले आणि चार तासांनी तिन्ही नेते हॉटेल बाहेर पडले.
बविआच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळादरम्यान, एका निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले की हॉटेलच्या खोल्यांमधून ९.९३ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. विनोद तावडेंनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. मी केवळ निवडणूक प्रक्रियेबद्दल पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होतो, असं विनोद तावडेंनी म्हटलं आहे. "विवांता हॉटेल ठाकूरांचे आहे. त्यांच्या हॉटेलमध्ये जाऊन तेथे पैसे वाटण्यासाठी मी मूर्ख नाही. मी ४० वर्षांपासून राजकारणात आहे आणि मला कायदे आणि नियमांची जाणीव आहे, असेही तावडेंनी म्हटलं.
विनोद तावडेंनी केलेल्या दाव्यावर हितेंद्र ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "ते हॉटेल विनोद तावडेंनी माझ्या नावावर करावं. मी त्यांचा आयुष्यभर आभारी राहील. काल भिजलेल्या कोंबडीसारखे बसले होते. मला फोन करुन बोलवलं आणि मला इथून काढा सांगत होते. मी त्यांना माझ्या गाडीतून सोडलं. मुंबईला गेल्यावर त्यांना कंठ फुटला. त्यांनी मलाच थेट हॉटेलचं मालक बनवून टाकलं. जर ते हॉटेल माझं होतं तर त्यांनी ते बुक का केलं? खोटं बोल ठोकून बोल हा यांचा धंदा आहे," असं हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं.