Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 02:30 PM2024-11-19T14:30:44+5:302024-11-19T16:36:28+5:30
विरारच्या एका हॉटेलमध्ये विनोद तावडे यांनी पैसे वाटप केल्याच्या आरोपांवर हितेंद्र ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक उरला असताना विरारमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विरारमध्ये पैसे वाटपाच्या आरोपांवरून बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या सगळ्या प्रकारावरुन बविआचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. विनोद तावडेंवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी हितेंद्र ठाकूर यांनी केली आहे.
विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथे असलेल्या विवांता हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे महिलांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. यावेळी बविआच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये मोठा राडा घातला. आमदार क्षितिज ठाकूर यांच्यानतंर हितेंद्र ठाकूर देखील हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. भाजपकडूनच विनोद तावडे पैसे घेऊन येत असल्याची माहिती मिळाल्याचे हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं आहे.
विनोद तावडे यांनी पैसे वाटप केल्याच्या आरोपांवर हितेंद्र ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मला भाजपवाल्यांनी सांगितले होते की विनोद तावडे पाच कोटी रुपये घेऊन येत आहेत. मला वाटलं राष्ट्रीय नेते एवढं लहान काम करणार नाहीत. एकडे आलो तर बघितलं की पैसे मिळालेत, वाटप पण सुरु आहे. आता लपून बसले आहेत. त्यांच्याकडे डायरी पण सापडली आहे. निवडणूक आयोगाने आणि पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी. हॉटेलचे सीसीटीव्ही बंद होते. आम्ही आल्यानंतर सीसीटीव्ही सुरु करण्यात आले आहेत. मधल्या काळातले सीसीटीव्ही कुठे गेले याची माहिती घेतली पाहिजे," असं हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं आहे.
"विनोद तावडेंनी २५ फोन केले"
"पाच कोटी रुपये घेऊन विनोद तावडे तिथे आले होते. दोन डायऱ्यादेखील तिथे मिळाल्या आहेत. कुठे कसं वाटप केलं वगैरे माहिती त्यात आहे. विनोद तावडे हे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. यांना एवढी अक्कल नाही की नेत्यांनी ४८ तास आधी इतर मतदारसंघ सोडायचे असतात. एवढा साधा नियम आहे. आज कार्यकर्त्यांची बैठक होती आणि काय चाललंय हे? आता पोलीस काय करतायत हे बघायचं आहे. प्रत्यक्ष पैसे वाटप होत असताना मी पाहिलेलं नाही. पण तिथे पैसे वाटले गेले आहेत. विनोद तावडे मला फोन करून विनंती करत आहेत की सोडवा यातून, माझी चूक झाली. माझ्या फोनवर त्यांचे २५ फोन आले आहेत," असंही हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं.