...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 04:10 PM2024-11-19T16:10:37+5:302024-11-19T16:11:32+5:30

विरारच्या विवांता हॉटेलमध्ये झालेल्या राड्यानंतर विनोद तावडे हे ठाकूर पिता-पुत्र एकाच गाडीने रवाना झाले आहेत.

Maharashtra Assembly Election 2024 Vinod Tawde and Hitendra Thakur left in the same car after the clash in Vivanta Hotel in Virar | ...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?

...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला काही तास शिल्लक असताना विरारच्या विवांता हॉटेलमध्ये सकाळच्या सुमारास मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळालं. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, राजन नाईक हे इतर पदाधिकाऱ्यांसह पैसे वाटत असल्याचा आरोप करत बविआच्या कार्यकर्त्यांना विवांता हॉटेलमध्ये गोंधळ घातला. विनोद तावडे हे पैसे वाटण्यासाठी आल्याचा आरोप करत बविआ कार्यकर्त्यांनी त्यांना रोखून धरलं होतं. शेवटी हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतल्यानंतर विनोद तावडे हॉटेलमधून बाहेर पडले. मात्र त्यानंतर ही विनोद तावडे अन् ठाकूर पिता-पुत्र एकाच गाडीने रवाना झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

विवांता हॉटेल येथे मतदारांना बोलावून पैसे वाटले जात असल्याचा दावा बविआच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. काही कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये थांबलेल्या विनोद तावडे यांना याबाबत जाब विचारण्यास सुरुवात केली. त्यावेळी विनोद तावडे यांनी आपण फक्त मार्गदर्शन करण्यासाठी आलो असल्याचे बविआच्या कार्यकर्त्यांना सांगितले. मात्र बविआचे कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. हा प्रकार समोर आल्यांनतर नालासोपाऱ्याचे आमदार आणि बविआचे उमेदवार क्षितिज ठाकूर यांनी त्वरीत धाव घेत निवडणूक अधिकारी आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. मतदानासाठी मोठ्या प्रमाणावर भाजपकडून पैशाचा वापर होत असून हे दुर्दैवी असल्याचे क्षितिज ठाकुरांनी म्हटलं.

त्यानंतर बविआचे प्रमुख हितेंद्र ठाकूर हे देखील विवांता हॉटेलमध्ये दाखल झाले. यावेळी ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना भाजपच्या लोकांनीच मला विनोद तावडे पैसे वाटण्यासाठी येणार असल्याचे सांगितल्याचे म्हटलं. यावेळी त्यांनी विनोद तावडे यांच्याकडे तीन डायऱ्या देखील सापडल्याचे म्हटलं. या सगळ्या दरम्यान, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना हॉटेलच्या एका खोलीतून नऊ लाख रुपयांची रोकड देखील सापडली. त्यामुळे वातावरण आणखीनच तापलं. या सगळ्या प्रकारानंतर विनोद तावडे, हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषदत घेत आपलं म्हणणं मांडले. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी ही पत्रकार परिषद थांबवली.

विनोद तावडेंचा ठाकूर पिता पुत्राच्या गाडीतून प्रवास

त्यानंतर हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर हे कार्यकर्त्यांसह हॉटेलमधून बाहेर पडले. थोड्या वेळाने विनोद तावडे देखील हॉटेलच्या बाहेर पडले आणि आपल्या गाडीत जाऊन बसले. मात्र त्यानंतर हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडेंना आपल्या गाडीत बसवलं. क्षितिज ठाकूर ही गाडी चालवत होते. त्यानंतर तिघेही एकाच गाडीतून निघून गेले. यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी मिश्किलपणे विनोद तावडे उरलेले पैसे मला देतील असं म्हटलं. तसेच आपण जेवायला जात असल्याचे हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं. तर विनोद तावडे हे मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.

विनोद तावडेंविरोधात गुन्हा

दरम्यान, बविआने पैसे वाटल्याचा आरोप केल्यानंतर विनोद तावडे आणि राजन नाईक यांच्याविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या तक्रारीनंतर तुळींज पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 Vinod Tawde and Hitendra Thakur left in the same car after the clash in Vivanta Hotel in Virar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.